शिंदेंचा पराभव करायचा असेल तर…; संजय राऊतांची गणेश नाईकांना मोठी ऑफर

ठाणे आणि नवी मुंबईतील भ्रष्टाचार आणि सत्ताधाऱ्यांच्या अरेरावीवरून गणेश नाईक विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष पेटला आहे. या वादात आता संजय राऊत यांनी उडी घेतली असून, नाईक यांनी पुन्हा शिवसेनेत परतावे असा 'प्रेमाचा सल्ला' दिला आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

शिंदेंचा पराभव करायचा असेल तर...; संजय राऊतांची गणेश नाईकांना मोठी ऑफर
sanjay raut ganesh naik
| Updated on: Feb 16, 2026 | 11:05 AM

ठाणे आणि नवी मुंबईतील भ्रष्टाचार तसेच सत्ताधाऱ्यांच्या अरेरावीविरोधात भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाईक यांना निवडणुकीत समोरासमोर लढण्याचे आव्हान दिले आहे. आता या संघर्षात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना थेट स्वगृही (शिवसेनेत) परतण्याचे आवाहन केले आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत कलह आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद दिल्लीत पार पडली. यावेळी एका पत्रकाराने गणेश नाईक यांच्याबद्दलचा सवाल विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. गणेश नाईक यांनी स्वगृही यावं. शिवसेनेत यावं आणि या लढाईच रणशिंग फुंकाव विजय गणेश नाईकांचाच होईल, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

विजय गणेश नाईकांचाच होईल

माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे. भाजपमध्ये राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही. कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शाहांचा आहे. भाजपसोबत राहून त्यांची ही लढाई टोकाला जाणार नाही. त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही यावं. शिवसेनेत यावं आणि या लढाईच रणशिंग फुंकाव विजय गणेश नाईकांचाच होईल, असे संजय राऊत म्हणाले.

ही लढाई त्यांना सत्तेत राहून लढता येणार नाही

गणेश नाईकांनी भ्रष्टाचार, अरेरावीविरुद्ध जे रणशिंग फुंकलेले आहे त्यांच्याच जिल्ह्यात ते आधी समजून घ्या. नवी मुंबई आणि ठाण्यातील मोक्याचे भूखंड कसे बिल्डरांच्या घशात गेलेत. रस्ते, बगीचांसाठी राखीव असलेले भूखंड कसे दिले, कसा भ्रष्टाचार झाला. एकदा गणेश नाईक म्हणाले आहेत की कशाप्रकारे एकनाथ शिंदे हे एक दिवस तुरुंगात जातील. हा भ्रष्टाचार असाच सुरु राहिला तर एकनाथ शिंदेंना तुरुंगात जावं लागेल, असं गणेश नाईक म्हणतात. पण त्यांना सरकारचं पाठबळं मिळतंय का? ही लढाई त्यांना सत्तेत राहून लढता येणार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले.