बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही? संजय राऊत स्पष्ट बोलले

राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत खलबतं सुरू असून, संजय राऊत आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. जागावाटप आणि इच्छुक उमेदवारांबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही? संजय राऊत स्पष्ट बोलले
Sanjay Raut
| Updated on: Apr 05, 2026 | 10:41 AM

राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन रिक्त विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता याच राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात आज दुपारी १ वाजता शिवसेना ठाकरे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राहुरीच्या जागेसाठी शिवसेनेतूनही काही जण इच्छुक असले तरी, मविआ म्हणून एकत्रित निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोटनिवडणुकांच्या उमेदवारांबद्दल भाष्य केले. बारामती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली असली, तरी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडी एकसंध असून मित्रपक्षांशी संवाद साधूनच अंतिम उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत काय म्हणाले?

महाविकास आघाडीत चर्चा सुरू नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. कालच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली आहे. राहुरी संदर्भात आज शरद पवारांची बैठक असून काँग्रेस नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा शरद पवारांच्या पक्षाच्या असल्याने त्याबाबतचा अंतिम निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. आमच्या पक्षाकडून जरी तीन जण इच्छुक असले, तरी मविआ म्हणून एकत्रित निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे यावेळी निवडणूक लढवणार की नाही, याबद्दल राष्ट्रवादीचा निर्णय झाल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस आपली भूमिका ठरवेल, असे संजय राऊत म्हणाले.

सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी नक्कीच चर्चा केली आहे. राजकारणात अशा चर्चा होत असतात. मात्र, त्या भाजपसोबत निवडणूक लढवत असल्याने त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी बिनविरोध निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही जाहीर भूमिका मांडलेली नाही, असे संजय राऊतांनी सांगितले.

मत व्यक्त करण्यापासून रोखणे चुकीचे

अजित पवारांच्या निधनानंतर एक सहानुभूती आहे. आदर आहे. पण म्हणून निवडणुका लढवायच्या नाही, हा अट्टाहास चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाण यांनाही निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. जे मतदार सरकारवर नाराज आहेत, त्यांच्यासाठी बिनविरोध निवडणूक म्हणजे अन्याय आहे; त्यांना मत व्यक्त करण्यापासून रोखणे चुकीचे आहे. सरकार जेव्हा आमदार-खासदार फोडते, तेव्हा लोकशाहीत निवडणूक होणे आवश्यक आहे, असेही शरद पवारांनी म्हटले.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी कोणाला मुलाखती घ्यायच्या असतील तर त्यांनी त्या बिनधास्त घ्याव्यात. त्यानंतर तिन्ही पक्ष मिळून समन्वयाने अंतिम निर्णय घेतील, असेही शरद पवार म्हणाले.

Follow Us