
बहुप्रतिक्षित अशी राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक नुकतीच पार पडली. मतमोजणी होऊन निकालही लागले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुबई महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाने बहुमत मिळवल्याने त्यांचा महापौर होणार हेही स्पष्ट झालं. मात्र मुंबईचा महापौर कोण, कधी याकडे सर्वांच लक्ष आहे. मुंबईच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली. महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटले. महापौरपदासाठी अनेक जण उत्सुक असले तरी महापौर पदाच्या (Mumbai Mayor) निवडीचा मुहूर्त काही अद्याप निघालेला नाही. त्यातच आता महापौर पदाची निव ही आणखी लांबणीवर पडू शकते अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.
या महिनाअखेर महापौरांची निवड होणार होती, मात्र भाजप आणि शिंदेसेनेने अद्यापही कोकण आयुक्तांकडे गटाची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आता हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून नवीन महापौरांची निवड व्हायला फेब्रुवारी महीना उजाडेल असं दिसत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सवाल विचारण्यात आला असता त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. शिंदेंची सेना आणि भाजपची गटस्थापना झाली नाही. गट स्थापना बहुतेक घटस्थापनेपर्यंत होईल असा टोला राऊत यांनी लगावला.
सुनबाई रुसल्या, सासरा काही ऐकेना – राऊतांची टिप्पणी
याच मुद्यावर पुढे बोलताना राऊतांनी आणखी टीका केली. एकनाथ शिंदे आणि भाजपचं काही जुळत नाहीये. तिकडे शिंदे रुसून बसलेत. रुसून बसलेली सून बाई सारख्या दिल्लीत फेऱ्या मारत आहेत. पण दिल्लीचे सासरे काही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे नववधूची अडचण झाली आहे. करे तो क्या करे ? असा सवाल विचारत इज्जत का सवाल असा टोला राऊतांनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. (भाजप-शिंदे) बोलून तर गेलेत की आमचा महापौर होणार, भाजपची एक भूमिका असते की माझं ते माझं, तुझं ते आमच्या बापाचं अशा शब्दांत राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
लापता म्हणून पोस्टर लावू
महापालिका निवडणुकांनंतर ठाकरे गटाचे निवडून आलेले काही नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. ते शिंदे गटाशी संपर्कात आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यावर राऊतांना सवाल विचारण्यात आला. आम्ही आता कल्याण डोंबिवलीत लापता म्हणून पोस्टर लावू. गुन्हा दाखल करू. कल्याण डोंबिवलीत, भाजपच्या कार्यालयात, शिंदेंच्या कार्यालयात आपण यांना पाहिलेत का चे पोस्टर लावू अशा उपहासात्मक शब्दांत त्यांनी या मुद्यावर टीकास्त्र सोडलं.