रामदास कदम, सुनील तटकरेंच्या वादावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांना डिवचलं, म्हणाले…
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजितदादांच्या घातपातामध्ये तटकरे यांचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असं कदम यांनी म्हटलं, दरम्यान या सर्व प्रकरणावर आता संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजितदादांच्या घातपातामध्ये तटकरे यांचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे असं कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान कदम यांच्या आरोपांनंतर आता तटकरे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत, त्यावर कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान कदम आणि तटकरे यांच्या वादावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील डिवचलं आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
मी कोणाचं नाव घेणार नाही, ते घेणे योग्य नाही, कदम देखील सरकारमध्ये आहेत, तटकरे देखील सरकारमध्ये आहेत. दोन्ही पक्षाचे लोक सरकारमध्ये आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत, त्या गृहमंत्र्यांनी यावर बोलायला पाहिजे, पण त्यांना अधिकार नाही, असं राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान दिवाळीवर काही अंशी सरकारच्या वतीने निर्बंध घालण्यात आले आहेत, यावर देखील यावेळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार निर्बंध घालत असतं, सरकारला दुसरं काम काय आहे? किंवा न्यायालयाला दुसरं काय काम आहे? ब्रिटिशांच्या काळात सुद्धा हिंदू सण आणि उत्सवावर एवढे निर्बंध नव्हते. सरकार कोणतच वादी नसतं, सरकार फक्त मतवादी असतं. ते मतांसाठी कोणतंही काम करू शकतात. दिवाळीवरती निर्बंध नसावेत, लोकांना फटाके वाजवायचे आहेत तर त्यांना वाजू द्या, दोन दिवस वाजवतील. कायतर म्हणे हवेचा थर खालावतो, मग इतर वेळी काय वर जातो का? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने भांडुपचा भांडुपेश्वर कुंड परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तिथे पहाणी करण्यासाठी आले असताना संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.