
महायुतीमधील मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यात मोठी खळबळ माजली होती. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी शिरसाटांचा एक व्हिडीओ समोर आणला होता. त्यामध्ये शिरसाट यांच्यासमोर पैशाने भरलेली एक बॅग दिसत होती, त्यावरून राजकीय वातावरण बरंच तापलं. बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र आता याच मुद्यावरून संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊत यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली आहे. तसेच आपण त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगत माफी मागितली नाही तर गुन्हा दाखल करेन असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
राऊतांवर भडकले संजय शिरसाट
मला बदनाम करण्यासाठी हा मर्फ व्हीडिओ वापरला आहे, अशा लोकांना धडा शिकवायला हवा. स्वप्ना पाटकर हिच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते ऐकलं तर कळेल की यांची लायकी किती आहे. म्हणून चारित्र्यहनन करण्याचा प्रकार हे जे वारंवार करतात त्यासाठी मी अब्रूनुकसानीची एक नोटीस आज पाठवणार आहे, त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला. ते राज्यघटना तर मानतच नाहीत, त्यांना त्याचं काही घेणदेणं नाही. ते फुशारकीने सांगतील की अशा फार नोटीसा मी खिशात घालून फिरतो, असं ते बोलतीलंही. पण कायद्याच्या चौकटीत राहून मी आज त्यांना नोटीस पाठवणार आहे, असं शिरसाट म्हणाले. फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करू असं त्यांनी सांगितलं.
त्यांना मानच नाही, शिरसाट कडाडले
त्यांना मान वगैरे नाहीच, त्यांची लायकीच ती आहे. रोज ते लोकांच्या शिव्या खातात, सकाळी जो भोंगा वाजतो ना, लोकं रोज त्यांना शिव्या देतात, तरीही त्यांना मान-अपमान काही कळत नाही. कोणत्या गोष्टीवर बोलावं याचं त्यांना भान नाहीये, त्यांचे जे सहकारी आहेत तेही असेच आरोप करत राहणार. सगळ्या दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. त्यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, पण तेवढ्या खालच्या राजकारणाला जायचं नाहीये, ती पातळी गाठायची नाहीये.
माझ्याविरोधात आणखी गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर…
पण आता मला असं वाटायला लागलं आहे की त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं आहे, कुठे-कुठे, कशा सरकारी बंगल्यात पार्ट्या केल्यात त्याचे व्हिडीओ मलासुद्धा दाखवावे लागतील, असा थेट इशाराच शिरसाट यांनी दिला. मुंबई असो की पुणा, सगळे प्रकार जेव्हा मी काढेन तेव्हा त्यांना पळता भुई थोडी होईल. पण या नीच पातळीवर जाण्याची आज तरी माझी इच्छा नाहीये. पण त्यांनी माझ्याविरोधात आणखी गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चितच त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल असं शिरसाट यांनी ठणकावून सांगितलं. नालयकांनो कुठला तरी व्हीडिओ काढला माझा, लाज लज्जा वाटते का, नीच पातळी गाठत आहात, हे सगळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे असा आरोपही त्यांनी केला.