दम असेल तर… किंमत मोजावी लागेल… राजकारणातील दोन संजय आमने-सामने; कुणी कुणाला दिलं चॅलेंज?
संजय शिरसाट यांच्या मुलाने विट्स हॉटेल लिलावातून कमी किमतीत हॉटेल खरेदी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. शिरसाट यांनी हा लिलाव न्यायालयाच्या आदेशाने झाला असल्याचे स्पष्टीकरण दिले.

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेतून घेतल्याच्या आरोपावरून राज्याच्या राजकारणात खडाजंगी पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत ११० कोटी रुपये असताना, ते केवळ ६७ कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावर संजय शिरसाट यांनी राऊत यांना मूर्ख माणूस म्हणत विट्स हॉटेलचा लिलाव न्यायालयाच्या आदेशाने झाला” असे स्पष्टीकरण दिले होते. त्यातच आज पुन्हा एकदा याच मुद्द्यावरुन संजय राऊत विरुद्ध संजय शिरसाट आमने-सामने आले आहेत.
आठव्या वेळेला माझ्या मुलाने बोली लावली
संजय शिरसाट यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विट्स हॉटेलबद्दल भाष्य केले. “विट्स हॉटेलचे भागधारक कोर्टात गेले होते आणि कोर्टानेच लिलावाचे आदेश दिले होते. या हॉटेलसाठी ७ वेळा लिलावाची नोटीस काढण्यात आली होती आणि आठव्या वेळेला माझ्या मुलाने बोली लावली. माझ्या मुलासोबत त्याचे भागीदार मित्रही होते. टेंडर घेतल्यानंतर २५ टक्के किंमत एका महिन्यात भरावी लागते. एवढी मोठी हॉटेल कसे घेतले, पैसा कुठून आणला’ असे मूर्खासारखे प्रश्न विचारले जात होते. ६७ कोटी रुपये व्हाईटमधून भरायचे आहेत, इथे ब्लॅक अँड व्हाईटचा प्रश्नच येत नाही.” असे संजय शिरसाट म्हणाले.
दम असेल तर तुम्ही टेंडर भरा आणि हॉटेल घ्या
संजय शिरसाट यांनी यावेळी संजय राऊत यांनी सांगितलेल्या ११० कोटींच्या किंमतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आम्ही आठव्या वेळेला टेंडर घेतलं, मराठी माणसाच्या हक्काचं बोलणाऱ्यांना काय पोटशूळ उठलं आहे? प्रोसेस पूर्ण तर होऊ द्या. मी आज निर्णय घेतला आहे. ११० कोटी आहेत ना? संजय राऊतला कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. तुमची लायकी नसल्यामुळे तुम्हाला लोन मिळत नाही. मी कुणाच्या घरात लोन मागायला गेलो नाही, लोन देणारे माझ्या दारात येतात. मी माझ्या मुलाला सांगणार आहे, टेंडरमधून बाहेर व्हा. दम असेल तर तुम्ही टेंडर भरा आणि हॉटेल घ्या”, असे ओपन चॅलेंज संजय शिरसाट यांनी दिले आहे.
“एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहात. राजकारण करताना समोरासमोर करा. कुटुंबाचा वापर करून कुणीही आरोप करू नये. संजय शिरसाट तुमच्या स्वागताला येईल, असे आरोप करण्यापूर्वी १० वेळा विचार करा. तुम्ही धंद्याला खोडा घालण्यासाठी जे आरोप केले आहेत, त्याने काही भलं होणार नाही. माझ्या नादी लागताना राजकीय आरोप करा, मात्र व्यवसाय, मुला-बाळांबद्दल जे आरोप करतायतं, तुम्हाला किंमत मोजावी लागेल.” अशी टीका संजय शिरसाटांनी केली.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय शिरसाट यांच्या या टीकेला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले. “मी आरोप केला नव्हता. मी काही प्रश्न विचारले होते. आरोप कशाकरता करायचे? खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला हवं या मताचे आम्ही आहोत. शिवसेनेची स्थापना यासाठीच झाली आहे. आपली मराठी मुलं, मराठी तरुण यांनी नोकऱ्या न करता ते नोकऱ्या देणारे व्हावेत. त्यांनी उद्योग करावेत. फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून, अशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्राची लूट करू नका, अशी आमची भूमिका आहे.” असे संजय राऊत म्हणाले.
त्याशिवाय ते मुंबईत ७२व्या माळ्यावर राहायला गेले का?
“संजय शिरसाट यांचं आतापर्यंतचं जे काही काम आहे, त्याशिवाय ते मुंबईत ७२व्या माळ्यावर राहायला गेले का? ते शिवसेनेमुळेच गेले ना. मुंबईतील ७२व्या माळ्यावर आम्ही देखील राहत नाही. ग्रामीण भागातील एक तरुण ७२व्या माळ्यावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची कृपा आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे.” असेही संजय राऊतांनी म्हटले. “कोण शिरसाट सोडून द्या, असे खूप येतात आणि जातात,” असेही ते म्हणाले.
