
मोठी बातमी समोर येत आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन मागे घेतलं आहे. अन्नत्याग आंदोलनात आम्ही कुटुंबीय सहभागी झालो होतो, ज्या काही आमच्या मागण्या होत्या, सरकारी वकिलांची नियुक्ती असेल किंवा इतर काही मागण्या होत्या. त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी काही वेळ मागितला आहे. चार-पाच दिवसांचा वेळ त्यांनी मागितला आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. त्याननंतर गावकरी जी दिशा ठरवतील तसं आपण करू असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मागण्यासंदर्भात चर्चा झाली आहे, पुढील काही दिवसांमध्ये आमच्या मागण्या पूर्ण होतील अशी अशा मी बाळगतो. आंदोलन किती दिवस स्थगित राहणार याबाबत अजून कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. पुढील निर्णय ग्रामस्थ घेतील, त्यात मी सहभागी असेल. दरम्यान आज या आंदोलनाला भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की काही गोष्टी फक्त मला आणि धनंजय देशमुख यांनाच माहिती आहेत, याबाबत धनंजय देशमुख यांना विचारलं असता, त्यावर मी आज बोलणार नाही, कारण त्या गोष्टी लिक नाही झाल्या पाहिजेत. त्यावर नंतर सविस्तर बोलेल असं त्यांनी म्हटलं आहे.
आज आंदोलन मागे घेण्यात आलं आहे, यावर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासनाने वेळ मागितला आहे, त्यामुळे हे आंदोलन काही काळापुरतं स्थगित करण्यात आलं आहे. आम्ही दहा तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिला आहे.
पोलीस प्रशासनाने अद्यापही एसपीकडे किंवा ॲडिशनल एसपीकडे तपास वर्ग केलेला नाही. त्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. आम्हाला वेळ द्या, आम्ही चौकशी करू नंतर तुमच्या ज्या मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी आता दहा मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं वैभवी देशमुख यांची म्हटलं आहे.