
भारतीय सैन्य दलातील जवान आपल्या प्राणाची बाजी लावत सीमेवर देशाचे संरक्षण करताना पहायला मिळतात. या जवानांमुळेच आपण मोकळा श्वास घेत आहोत. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण भारतीय सैन्याची ताकद पाहिली आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यावेळी भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले होते. अशातच आता साताऱ्यातून एक मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
साताऱ्याच्या दरे या गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. ते पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आले होते. मात्र त्यांचे अपघाती निधन झाले आहे. प्रमोद जाधव यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. प्रमोद यांच्या पश्चात वडील त्यांची पत्नी आणि नवजात बालक (मुलगी) असा परिवार आहे.
वीर जवान प्रमोद यांना आई नसल्यामुळे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते मागील आठ दिवसापूर्वी सुट्टीवर गावी आले होते होते. यादरम्यान काही कामानिमित्त वाढे फाटा येथे दुचाकीवर जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात जागीच मृत्यू झाला. यामुळे दरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूनंतर काही वेळाने त्यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला.
आज सकाळी प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. वीर जवान प्रमोद यांची अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वीर जवान प्रमोद यांची पत्नी आणि लहान बाळाला अंत्यविधीच्या ठिकाणी अंतदर्शनासाठी आणण्यात आले. त्यांची पत्नी स्ट्रेचरवर होती. त्यांच्या हाताला सलाईन लावलेलं होते. हा क्षण पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. आपल्या पत्नीच्या प्रसुतीसाठी सुट्टीवर आलेल्या प्रमोद यांना आपल्या लेकीचा चेहरा पाहता आला नाही. त्यामुळे उपस्थित नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्यानंतर त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील हजारो लोक उपस्थित होते.