EXCLUSIVE : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा शेतात मशागत करतात, पाहा एकनाथ शिंदेंचं अनोखं रुप

| Updated on: Nov 01, 2022 | 6:05 PM

मुख्यमंत्री एकनाथ शेती आज त्यांच्या स्वत:च्या साताऱ्यातील दरे गावात दाखल झाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे आज वेगळ्याच रुपात दिसले.

EXCLUSIVE : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा शेतात मशागत करतात, पाहा एकनाथ शिंदेंचं अनोखं रुप
Follow us on

सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. महाराष्ट्रात गेल्या साडेतीन महिन्यांपूर्वी सत्तापालट झालं आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे कामात प्रचंड व्यस्त असल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदेंनी संपूर्ण राज्य विविध कामांनिमित्त पिंजून काढलं. या दरम्यानच्या काळात ते दिल्ली देखील जावून आले. गणपती, दहीहंडी आणि नवरात्रौत्सवात जिथे बघावं तिथे शिंदे कार्यक्रमात व्यस्त असल्याचं बघायला मिळालं. शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेणं असेल किंवा राज्यातील गोरगरीब जनतेला दिवाळीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप  योजना सुरु करुन देणं असेल , प्रत्येक ठिकाणी शिंदे झोकून देवून काम करताना दिसले. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या या सर्व बिझी शेड्यूलमधून वेळ काढत स्वत:च्या शेतीची मशागत करण्यासाठी वेळ काढला. तिथे त्यांनी आपल्या गुरांना चारा घातला. पिकांना पाणी दिलं. शेतीची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत देखील दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शेती आज त्यांच्या स्वत:च्या साताऱ्यातील दरे गावात दाखल झाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे आज वेगळ्याच रुपात दिसले. त्यांनी आज आपल्या शेतात जाऊन शेतीची पाहणी केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी स्वत: शेतीची मशागत केली. त्यांच्या शेतात काम करतानाचे काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

मुख्यमंत्री त्यांच्या कामात खूप व्यस्त असतात. पण आज त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रातून वेळ काढत दरे गावाला भेट दिलीय. या दरम्यान त्यांनी स्वत: शेतीची मशागत केली. शेताची पाहणी केली. तसेच गुरांना चारादेखील खाऊ घातला. या दरम्यान त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा

‘आजोबा, वडिलांसोबत शेती केली’

“शेतीची आवड आहे. आमचे आजोबा, वडील शेतकरी आहेत. आमचं सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. माझा जन्म इकडेच झाला. मी जेव्हा जेव्हा इकडे येतो तेव्हा झाडे लावणं, शेतीची मशागत करणं असे अनेक कामं करत असतो. मी माझ्या आजोबांबरोबर, वडिलांसोबत शेतीत काम केलंय”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

“आता मुलगा श्रीकांतही त्यात सहभागी होतोय. श्रीकांतने इकडे खूप वेगवेगळ्या पिकांची लागवड केलीय. श्रीकांतने हळद, तसेच अनेक औषधी वनस्पतींची लागवड केलीय. काजू, आंबे, मोसंबी, संत्रा अशी अनेक फळांची लागवड केली आहे”, असं शिंदे म्हणाले.

“इथे गोशाळेत मला समाधान मिळतं. मला पूर्वीपासून गोशाळेत जायला आवडतं. मला जेव्हा संधी मिळते तेव्हा गोशाळेच्या कार्यक्रमात जातो. मला गोशाळेला माझ्यावतीने जितकं सहकार्य करण्याचा प्रयत्न होईल तितकं मी सहकार्य करतो”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘शेतात स्वत: काम केलं पाहिजे’

“आपण शेतात स्वत: केलं पाहिजे. तेव्हा आपण दुसऱ्याला सांगू शकतो. नवं तंत्रज्ञान वापरायला हवं. आपण इथे ते वापरलं आहे. ठिबक सिंचनने एकाच वेळी सगळ्याच झाडांना पाणी मिळतं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

“मला गावाची ओढ आधीपासून आहे. मी वर्षातून एक-दोन वेळा तरी गावाला भेट देतो. त्यामुळे मी वेळ काढून इथे आलो. इथे छान वाटतं. निसर्गरम्य वातावरण आहे. वाहनं नाहीत, मोबाईलची रेंज पकडत नाही. शांतता आहे, प्रदूषन नाही, आवाज नाही. शांततेचा अनुभव घ्यायला मिळतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.