Sugar Cane Protest: ऊस दराप्रकरणी तोडगा निघणार, स्वाभिमानीची नवीन मागणी, राजू शेट्टी यांचं एक पाऊल मागे? मोठी अपडेट समोर
Swabhimani Shetkari Saghatana Sugarcane Protest: ऊसदरासाठी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत आंदोलन पेटलेले असतानाच आता तोडगा निघण्याची आशाही उंचावली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक पाऊल मागे टाकत दराविषयीची नवीन मागणी केली आहे. तर राजू शेट्टी यांनी ट्रक वाहनचालकांची माफी मागितली आहे.

Swabhimani Shetkari Saghatana Sugarcane Protest : गेल्या 40 तासांहून अधिक तास उलटूनही स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर आहे. ऊसदराचे आंदोलन पश्चिम महाराष्ट्रात पेटले आहे. ऊसदरासाठी कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. राजू शेट्टी सुद्धा ठिय्या मांडून आहेत. यामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरावर तोडगा काढण्यासाठी आता स्वाभिमानी पक्षानेही एक पाऊल टाकले आहे. तर राजू शेट्टी यांनी ट्रक वाहनचालकांची माफी मागितली आहे.
4500 ऐवजी 4200 रुपये भाव
मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदर भाव वाढून मिळावा म्हणून रस्त्यावर उतरली. ऊसाला पहिली उचल साडेचार हजार रुपये मिळावी, अशी मागणी करण्यात आली. सरकारने साखरेची एमएसपी ५० रुपये करावी आणि इथेनॉलच्या दरात १२ रुपयांची वाढ करून तो ७० रुपये करावा. राज्य सहकारी बँकेने साखरेचे मूल्य प्रति क्विंटल ४ हजार २०० रुपये केले असतानाही सर्वपक्षीय कारखानदार एकजूट करून शेतकऱ्यांना उचल देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला. आता स्वाभिमानीने एक पाऊल मागे टाकत पहिली उचल 4200 रुपये करण्याची मागणी केली आहे.
ऊस दराच्या मागणीवर आंदोलक ठाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा
ऊसाला दरवाढ मिळावी यासाठी सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे गावच्या हद्दीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मागील 40 तासापासून चक्काजाम आंदोलन सुरू असून जोपर्यंत शासन पातळीवर ऊस दराची निश्चिती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे यामुळे पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. या महामार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक बंद असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी पर्यायी मार्गाचे आवाहन केले आहे.
आंदोलनामुळे प्रभावित झालेल्या वाहन चालकांची मागितली जाहीर माफी
शेतकर्यांची कैफियत घेऊन गेल्या ३६ तासापासून आम्ही रस्त्यावर आंदोलन करतोय. मात्र त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते त्याबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागतो. पण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटल आहे. गेल्या ३६ तासापासून ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरच्या किणी टोल नाका परिसरात चक्काजाम आंदोलन सुरू केले. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राजू शेट्टींनी ऊस दराच्या बाबतीत एक पाऊल मागे येत 4500 रुपयांच्या वरून 4200 रुपयांवर तोडगा काढावा अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे कुटुंब प्रमुख म्हणून बघावं मात्र तुमचं तुम्ही बघा असं म्हणत ते बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोपही राजू शेट्टींनी यावेळी केला.
स्वाभिमानीच्या आंदोलनाला शशिकांत शिंदेंची भेट; ऊस दराच्या कोंडीवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी
ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साताऱ्यातील नागठाणे येथे पुकारलेल्या ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या या लढ्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकार आणि प्रशासनाच्या उदासीन कारभारावर जोरदार टीका केली. राज्याचा आणि देशाचा प्रमुख महामार्ग गेल्या ३६ तासांपासून बंद असतानाही, पालकमंत्री किंवा प्रशासनाने आंदोलकांशी अद्याप कोणतीही चर्चा न करणे हे सरकारचे मोठे अपयश असल्याचे शिंदे म्हणाले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता कारखानेही बंद पडू नयेत आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळावा, यासाठी सरकारने साखर कारखान्यांना विशेष अनुदान देऊन जागतिक साखर दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पालकमंत्र्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन करावे आणि ऊस दराची ही कोंडी फोडावी, असे आवाहनही शशिकांत शिंदे यांनी यावेळी केले.