
गेल्या महिन्यात कल्याणमधील एका शाळेनेअजब पतवा काढला होता. विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिळा लावण्यास तसेच हातात धागा बांधण्यास बंदी घालण्यात आली होती. यामुळे मोठा गदारोळ माजला होता. ते प्रकरण शांत होतं ना होतं तोच आता मुंबईतील चेंबूर येथील एक शाळेतही संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हातावर मेहंदी काढून आल्याने 15 ते 20 विद्यार्थिनींना थेट वर्गाबाहेर काढण्यात आलं. चेंबूरच्या सेंट अँथनी शआळेत हा भयानक प्रकार घडल्याचे समोर आले असून या विरोधात पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली आहे.
शाळेची नियमावली दाखवून, हात तपासून वर्गाबाहेर काढलं
नुकताच दिवाळीचा सण झाला. त्यानिमित्ताने अनेका जणी हातावर मेहंदी काढतात. लहान मुलींनाही मेहंदीची खूप हौस असते. दिवाळीच्या सुट्टीनंतर चेंबूरमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलही सुरू झाली. या विद्यार्थिनी नेहमीपर्रमाणे शाळेत गेल्या, पण तिथे त्यांच्यासोबत हा संतापजनक प्रकार घडला.
काही मुलींच्या हातावरची मेहंदी पूर्णपणे गेली नवह्ती, काहींच्या हातांवर मेहंदी होती. मात्र त्या मुलींना थेट वर्गाबाहेर काढण्यात आलं. शाळेची नियमावली दाखवून त्यांचे हात तपासून वर्गाबाहेर काढण्यात आलं अशी माहिती समोर आली आहे. पण यामुळे पालकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिक पक्षसंघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. यानंतर काल शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला; मात्र त्यांनाही उलटसुलट उत्तरे देण्यात आल्याचे पालकांनी सांगितले.
शिक्षण विभागाने बजावली नोटीस
हा प्रकार समोर आल्यावर सर्व सत्रांतून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान शिक्षण विभागाने या प्रकाराची तत्काळ दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली आहे. सेंट अँथनी शाळेतील हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याने या प्रकाराची शिक्षण निरीक्षक (उत्तर) डॉ. मुश्ताक शेख यांनी तत्काळ दखल घेऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला नोटीस बजावली. तसेच घडलेल्या या प्रकाराबाबत एका दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.