रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरानेच उचललं टोकाचं पाऊल; परिसरात एकच खळबळ
रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान देणाऱ्या एका डॉक्टरांनीच स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. डॉ. दिनेश भटकळ असं त्यांचं नाव असून ते 79 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते स्वत: कर्करोगाशी झुंज देत होते.

उपचार करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या एका ज्येष्ठ डॉक्टरानेच टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. कर्करोगाने त्रस्त असलेल्या या ज्येष्ठ डॉक्टराने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बेळगाव शहरात खळबळ उडाली आहे. डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ असं असून ते 79 वर्षांचे होते. ते मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे होते. अनेक वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर ते बेळगावमध्ये स्थायिक झाले होते. साधेपणा आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांची समाजात विशेष ओळख होती. डॉ. भटकळ यांनी असं पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
आजारपणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल?
बेळगावच्या केएलई रुग्णालयात ते कार्यरत होते. डॉ. दिनेश भटकळ यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्याचं सांगितलं जात आहे. कर्करोगान त्रस्त असल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. टिळकवाडी सीपीआयसह काही पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. ही घटना बेळगावमधील टिळकवाडीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भटकळ यांनी बेळगावमधील मंडोली रोडवरील आपल्या घराच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी तातडीने घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात आजारपण आणि मानसिक नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. डॉ. भटकळ यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.