
काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या खराडी भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, या प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. तब्बल दोन महिन्यांनंतर खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे. जामिनानंतर आता या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल देखील पोलिसांना प्राप्त झाला आहे, अहवालामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केलं नसल्याचं या अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान प्रांजल खेवलकर प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे, या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मला आधीपासूनच माहिती होतं, त्यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग्स सेवन केलेलं नाही, सहा जणांमध्ये ड्रग्स पार्टी होऊच शकत नाही, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना गुन्हे दाखल आहेत असं दाखवण्यात आलं, शेवटी पोलीस म्हणाले ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, असा मोठा दावा या प्रकरणावर बोलताना खडसे यांनी केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाला आणि ते आता बाहेर आहेत, त्यांनी ड्रग्स सेवन केले नसल्याचा अहवाल देखील समोर आला आहे. पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्या संदर्भात रेव्ह पार्टी आणि ड्रग्स सेवन केल्याचं वातावरण निर्माण केलं ते चुकीचं होतं. आता अहवाल समोर येतोय, त्यामुळे या प्रकरणात कुठलेही तथ्य नाही, हा फक्त बदनामीचा प्रकार होता, असं दिसत आहे. न्यायालयात सर्व बाबी समोर येतील, असं खडसे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी भागामध्ये सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता, या प्रकरणात खडसे यांच्या जवयासह सहा जणांना अटक करण्यात आली होती, याच प्रकरणाता फॉरेन्सिक अहवाल आता पोलिसांना प्रप्ता झाला आहे.