‘माझा अंघोळ करतानाचा व्हिडीओ…’, करुणा शर्मांच्या आरोपाने खळबळ, आणखी एक याचिका दाखल

करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत, तसेच त्यांनी आणखी एक याचिका दाखल करत मोठी मागणी केली आहे.

माझा अंघोळ करतानाचा व्हिडीओ..., करुणा शर्मांच्या आरोपाने खळबळ, आणखी एक याचिका दाखल
Karuna Sharma
| Updated on: May 03, 2025 | 6:22 PM

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. करुण शर्मा यांनी न्यायालयात आता आणखी एक याचिका दाखल करत मोठी मागणी केली आहे. धनंजय मुंडेंची जवळपास पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यासंदर्भात आज मी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ही संपत्ती कोणालाही खरेदी, विक्री करता येऊ नये, सगळ्या संपत्तीवर स्टे आणावा अशी मागणी मी याचिकेत केली असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत.

नेमकं काय म्हणाल्या करुणा शर्मा? 

‘बांद्रा न्यायालयात आमची तारीख होती, घरगुती हिंसाचाराची या प्रकरणात आमच्या वकिलांनी तीन याचिका दाखल केलेल्या आहेत. ज्यामध्ये  दोन लाख रुपये देण्याच्या निर्णयासंदर्भातील एक याचिका आहे. ज्या दिवशी कोर्टानं निकाल दिला, त्या दिवसापासून मला दिवसरात्र घाणेरड्या धमक्या दिल्या जात आहेत. माझे खोटे व्हिडीओ टाकण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे, ज्यामध्ये मी नाहीये, मी या संदर्भात तीन वर्षांपूर्वी देखील तक्रार दिलेली आहे. मात्र या संदर्भात अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाहीये, आणि आता तर ज्या व्हिडीओत मी नाहीच असे खोटे व्हिडीओ पोस्ट करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करुण शर्मा यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मला सतत धमक्या येत आहेत, माझे अंघोळ करतानाचे व्हिडीओ टाकण्याची धमकी, माझ्या मुलीला उचलून घेऊन जाण्याची धमकी मला हे लोक दररोज माझ्या व्हॉट्सअपवर देत आहेत. तुम्ही कोर्ट केस माघारी घ्या, तुम्ही धनंजय मुंडे यांची आमदारकी वापस घेण्यासंदर्भात जी याचिका दाखल केली आहे, ती माघारी घ्या. घरगुती हिंसाचाराची केस माघारी घ्या, असे हो लोक मागण्या करत आहेत, आणि त्यासाठी मला धमकावलं जात आहे, त्यासंदर्भात देखील मी याचिका दाखल केलेली आहे.

धनंजय मुंडेंची जी प्रॉपर्टी आहे, त्या पाचशे कोटी रुपयांच्या संपत्तीचे वरीजनल कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्यांची पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे, त्यासंदर्भात आज मी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. आमचा जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत ही संपत्ती कोणालाही खरेदी, विक्री करता येऊ नये अशी माझी मागणी आहे. सगळ्या संपत्तीवर स्टे आणला जावा, अशी माझी मागणी असल्याचं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.