
वरळी डोम येथे आज मराठी विजयी मेळावा होणार आहे. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्याचा विजय म्हणून हा मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 18 वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे उत्सुक्तेचा एक माहोल आहे. आज हा मेळावा होत असताना, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “एकनाथ शिंदे तुम्ही आता गुजरातचे आधार कार्ड, रेशनकार्ड काढा आणि गुजरातमध्ये राहायला जावा. तुमचे इथे काम नाही” असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे.
‘अरे तुझे नाव रामदास आणि वागणं, नीतिमत्ता रावणासारखी आहे’ अशा शब्दात रामदास कदम यांच्यावर शरद कोळी यांनी टीका केली. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र स्टेजवर पाहण्यासाठी आमचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे डोळे तरसलेत. सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते गाडी, रेल्वे, एसटीने मुंबईकडे निघालेत” असं शरद कोळी म्हणाले.
‘एकनाथ शिंदे गुजरातचे आधार कार्ड, रेशनकार्ड काढा’
“एकनाथ शिंदे हे गुजराती आणि अमित शाह यांचे कार्यकर्ते आहेत. एकनाथ शिंदे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचा अध्यक्ष अमित शाह आहेत. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी जय गुजरात म्हणावेच लागेल. खायचे महाराष्ट्राचे आणि गायचे गुजरातचे हे कितपत योग्य आहे. एकनाथ शिंदे तुम्ही आता गुजरातचे आधार कार्ड, रेशनकार्ड काढा आणि गुजरातमध्ये राहायला जावा. तुमचे इथे काम नाही” अशी टीका शरद कोळी यांनी केली.
‘नाव रामदास आणि वागणं रावणासारखं’
“रामदास कदम तुझी लायकी आहे कां? पळपुट्या, रडक्या, ढुंगणाला पाय लावून पळून गेलास आणि वर तोंड घेऊन काय बोलतोस. उद्धव साहेबांना बोलायची तुझी लायकी आहे का रामदास?. रामदास कदमाच्या पोराची चौकशी सुरू झालीय म्हणून भाजपला आणि वरिष्ठाना खूष करण्यासाठी बोलतोय. मात्र आमचे सरकार आल्यावर ही चौकशी उकरून आम्ही कारवाई करू. अरे तुझे नाव रामदास आणि वागणं, नीतिमत्ता रावणासारखी आहे” अशा जहरी शब्दात टीका केली.