Shivsena Symbol Hearing : उद्धव ठाकरे यांना हादरा देणारा दावा… थेट पक्षप्रमुख पदच… शिंदेंच्या वकिलाच्या युक्तिवादाने गेम पालटणार?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवसेनेच्या घटनेतील 'प्रतिनिधी सभा' आणि 'पक्षप्रमुख' पदाच्या निर्मितीवर युक्तिवाद केला. कौल यांनी 'पक्षप्रमुख' पद 2018 साली नव्हे, तर 2013 पासून अस्तित्वात असल्याचे पुरावे सादर केले, ठाकरे गटाच्या दाव्याला त्यांनी आव्हान दिलं.

केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशाचं लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे ( Uddhav Thackrey) गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टच्या अखेरीपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून युक्तिवाद सुरू झाला. आज पुन्हा ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल हे शिंदे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडत आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यापूर्वी ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले होते. आता शिंदे गटाकडून शिवसेनेची पक्षघटना, पक्षातील प्रतिनिधी सभा आणि पक्षप्रमुख पदाच्या निर्मितीबाबतचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले जात आहेत. याच दरम्यान कौल यांनी युक्तिवाद करत थेट पक्षप्रमुख पदावरूनच मोठा दावा केला ज्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या घटनेत नेमकं काय लिहिलं आहे?
सुनावणीदरम्यान नीरज कौल यांनी शिवसेनेच्या पक्षघटनेतील तरतुदी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. मागील सुनावणीवेळी १९९९ सालच्या शिवसेना घटनेबाबत आपण माहिती दिली होती, असं कौल यांनी न्यायालयाला सांगितलं. शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेमध्ये प्रतिनिधी सभा ही अत्यंत महत्त्वाची संस्था असल्याचा युक्तिवाद कौल यांनी केला. शिवसेना प्रमुखाची नियुक्ती ही प्रतिनिधी सभेच्या बैठकीनंतर केली जाते, अशी तरतूद पक्षघटनेत असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. याच पार्श्वभूमीवर पक्षातील सर्वोच्च पदाची रचना, त्यातील बदल आणि संबंधित घटनात्मक तरतुदी यांचा तपशील कौल यांनी न्यायालयासमोर मांडला. यावेळी त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रं आणि पक्षघटनेतील संबंधित मजकूरही न्यायालयासमोर दाखवला.
पक्षप्रमुख पद 2018 मध्ये निर्माण झालं हा दावा चुकीचा
शिंदे गटाच्या युक्तिवादातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘पक्षप्रमुख’ हे पद 2018 सालच्या पक्षघटनेत प्रथमच निर्माण झालं, हा दावा चुकीचा असल्याचं कौल यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ ‘शिवसेना प्रमुख’ हे पद गोठवण्यात आलं. ही प्रक्रिया 2013 मध्येच झाली होती. त्याच काळात पक्षातील नेतृत्वाच्या रचनेमध्ये ‘पक्षप्रमुख’ पद अस्तित्वात आल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. त्यामुळे ‘पक्षप्रमुख’ हे पद 2018 मध्येच प्रथम निर्माण झालं, असा युक्तिवाद योग्य नाही, असं कौल यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं. त्यांच्या या युक्तिवादामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो.
