मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी युतीबाबत घेतला मोठा निर्णय, पुण्यातून मोठी घोषणा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, एकनाथ शिंदे यांनी युतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंनी युतीबाबत घेतला मोठा निर्णय, पुण्यातून मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2025 | 9:12 PM

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, आता या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून,  सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढवल्या जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी महायुतीमधील तीनही पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निवडणुकीबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटानं पुण्यात पतित पावन संघटनेसोबत युती केली आहे. आज पुण्यात पतित पावन संघटना आणि शिवसेनेचा एकत्र मेळावा पार पडला, या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती. दरम्यान पतीत पावन संघटनेकडून देखील आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेकडे जागांची मागणी करण्यात आली आहे.

पतित पावन आणि शिवसेनेचा एकत्र मेळावा पार पडत आहे,  जो हिंदुत्व विसरला तो अस्तित्व विसरला जो अस्तित्व विसरला तो मेला.  हिंदुत्ववासाठी पतित पावनचं मोठं काम आहे. पतित पावन आणि शिवसेनेची विचारधारा एकसारखी आहे. योगेश कदम यांच्या प्रयत्नमुळे हा कार्यक्रम पार पडत आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी बोलताना म्हटलं.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पतित पावनला जिथे जिथे एकनाथ शिंदेंची गरज लागेल तिथे भाऊ म्हणून तुमच्या पाठीमागे उभा राहणार. बाळासाहेबांना नको होतं ते होऊ लागले तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उठाव केला. विकास होतच असतो. पण संस्कृती जपली पाहिजे. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांमध्ये संस्कृती जोपासली, आणि महाराष्ट्राला विकासाकडे नेलं. कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राजकारणात शब्दाला महत्त्व आहे.  काही लोक राजकारणासाठी शब्द देतात पण प्रिंटिंग मिस्टेकवाले आम्ही नाहीत. सत्तेची खुर्ची पाहून रंग बदलणारे आमचे हिंदुत्व नाही, असा हल्लाबोल यावेळी शिंदे यांनी केला आहे.