
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरु करण्यात आली आहे. बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. रिसॉर्ट पाडले जात आहे. या प्रकरणी अनिल परब आणि सदानंद कदम यांचा विरोधात दापोली पोलिस स्टेशन 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दापोलीमधील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हॉटेल आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट बांधताना २०० मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. समुद्र गिळंकृत केला, असा आरोप सोमय्या यांनी केला.
अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टचा प्रश्न भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरला होता. या ठिकाणी बेकायदेशी बांधकाम करुन गुन्हेगारी कृत्य केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यासंदर्भात तक्रारही केली होती. अखेर या रिसॉर्टचे बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भातील टि्वट सोमय्या यांनी केले आहे.
अनिल परब चा दापोली साई रिसॉर्ट वर हातोडा
तोडकाम सुरू….साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम विरोधात अनिल परब आणि सदानंद कदम वर फौजदारी कारवाई प्रक्रिया ही सुरू आहे सध्या दोघे जामीनावर आहे
हिसाब तो देना पड़ेगा@BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/uzbnrcfTC4
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) April 3, 2024
अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी, यासाठी किरीट सोमय्या सोमवारी रत्नागिरीत गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय मांडला. तसेच सीआरझेड कायदा उल्लंघनाची कारवाई करण्याची मागणी केली. सोमय्या यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले होते की, कोणावरही सरसकट कारवाई होणार नाही. मात्र ज्याचा अनधिकृत बांधकाम आहे. त्यावर कारवाई नक्की होणार आहे. अनिल परब आणि सदानंद कदम गावकऱ्यांना पुढे करून भावना भडकवण्याचा काम करत असेल तर त्यांना यश मिळणार नाही.
दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम करताना केवळ सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले नाही तर मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला होता. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकला गेला. त्यासाठी अधिकाऱ्यांना अवैध परवानगी देण्यास भाग पाडले, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.