‘निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेतला?’, ठाकरे गटाचा कोर्टात युक्तीवाद
"निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याता आदेश बेकायदेशीर आहे", अशी भूमिका ठाकरे गटाने आज दिल्ली हायकोर्टात मांडली.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं होतं. तसेच शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव वापरता येणार नाही, असा निकाल दिला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतलीय. “निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याता आदेश बेकायदेशीर आहे”, अशी भूमिका ठाकरे गटाने आज दिल्ली हायकोर्टात मांडली.
“मी पक्षाचा अध्यक्ष असून 30 वर्षांपासून पक्ष चालवतोय, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली हायकोर्टात वकिलांमार्फत म्हणाले आहेत. “प्रथमदर्शनी जे दिसतंय त्यावर निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.
“निवडणूक आयोगाचे चिन्ह गोठवण्याचे आदेश बेकायदेशीर आहेत”, असं ठाकरेंचं म्हणणं आहे. “या निर्णयामुळे पक्षाची राजकीय कामं खोळंबली आहेत. मी माझ्या वडिलांनी दिलेलं नाव आणि चिन्ह वापरु शकत नाही”, अशी उद्धव ठाकरे यांची बाजू वकिलांनी कोर्टात मांडली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबरला निर्णय दिला होता की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं चिन्ह आणि नाव वापरता येणार नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून दिल्ली हायकोर्टात निकालाविरोधात याचिका दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी न्यायमूर्ती संजय नरूला यांच्यासमोर आज सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला.
“निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलाय तो कुठल्या आधारावर दिलाय? मी गेल्या तीस वर्षांपासून पक्ष चालवतोय. तरीदेखील मी माझ्या वडिलांचं आणि पक्षाचं नाव वापरु शकत नाही. निवडणूक आयोगाने हा निर्णय बेकायदेशीर घेतला”, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका त्यांच्या वकिलांनी कोर्टात मांडली.
“निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सगळ्या बाबी आम्ही पूर्ण केल्या आहेत. आम्ही सर्व कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र सादर केले. तरीदेखील निवडणूक आयोगाने हा निर्णय कोणत्या आधारावर घेतला?”, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात उपस्थित केला.
दिल्ली हायकोर्टात या विषयी जवळपास तास ते दीड तास युक्तीवाद झाला. या प्रकरणी उद्या पुन्हा सकाळच्या सत्रात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आज दिल्ली हायकोर्टात उपस्थित होते. ते उद्यादेखील उपस्थित असणार आहेत.
दिल्ली हायकोर्ट उद्यादेखील ठाकरे गटाचा युक्तीवाद ऐकून घेणार आहे. त्यानंतर दिल्ली हायकोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
