काय करायचं ते करा; शिवाजी पार्कवर अमित ठाकरे मैदानात, ऐनवेळी पोलिसांच्या गराड्यात काय घडलं?
Amit Thackeray News: शिवाजी पार्कवर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. अमित ठाकरेंनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.

आज मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर सीजेपीने आंदोलनाचा हाक दिली आहे. मात्र आंदोलनाआधीच मुंबई पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मनसे नेते अमित ठाकरेंनाही पोलिसांनी अडवलं आहे. आंदोलनासाठी आलेल्या अंजली दमानियांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर अमित ठाकरेंनी यावर संताप व्यक्त केला आहे. त्यांची अडवणूक केल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यानंतर अमित ठाकरे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांच्या सुरू असलेल्या धरपकडीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कारवाईवर त्यांनी संताप बोलून दाखवला आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी प्रयत्न केला आहे. अमित ठाकरे म्हणाले की, मी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारणार आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची सुटका करा. ही कोणती नाटकं सुरू आहेत. अनेकांना विनाकारण ताब्यात घेतले आहे. भाजपचे गुंड दिल्लीत मुलींना मारत आहेत. महाराष्ट्रातही दिल्लीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. नेऊन नेऊन कुठे नेणार आहेत? बघतो ना मी पण. महाराष्ट्र पोलिसांचा आम्ही आदर करतो, पण ही कोणती पद्धत आहे? असा सवाल अमित ठाकरेंनी विचारला आहे.
ते म्हणाले की, आज हा शेवटचा दिवस. उद्यापासून मनसैनिक रस्त्यावर येतील. एवढा पोलिसांचा बंदोबस्त का आणि कशासाठी आहे? हे लोक शांततेत आंदोलन करणार म्हणून. आजपर्यंत मी असं शिवाजी पार्क पाहिलं नाही. चालता चालता मला पोलिसांनी थांबवलं आहे. आता सामान्य नागरिकांनी शिवाजी पार्कमध्ये राऊंड पण नाही मारायचा का? हे रोजच चालणार नाही. आम्ही इथले रहिवासी आहोत. आपण दिल्लीत नाही आहोत. आपण पोलिसांचा आदर करतो.
अमित ठाकरेंनी सांगितलं की, तुम्ही शिवाजी पार्कची अशी स्थिती करू शकत नाही. इथे महिलांवर हात टाकला जाऊ शकत नाही. हे समर्थक अतिरेकी आहेत का? ज्ञानेश कुमारांच्या विरोधात घोषणा देण्यासाठी निघणार ते. त्यांचा विरोध करायला आम्ही रस्त्यावर उतरायचं नाही का? तुम्ही अजून किती खालची पातळी गाठणार आहात? उद्याही हे येतील. तुम्ही हात लावून दाखवा. इथे मला उद्यापासून पोलीस नको आहेत, असं म्हणत त्यांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिलं आहे.
ते पुढे म्हणाले की, समर्थकांना आंदोलन करू द्या. अडचण काय आहे? ज्ञानेश कुमार हा भ्रष्ट माणूस आहे. तो गेलाच पाहिजे. त्यांच्याबद्दल एवढ्या गोष्टी समोर आल्यानंतर आम्ही बोलायचं नाही का? जे बोलत नाही त्यांनाही तुम्ही अडवत आहात. काल एकाला विमानात जाऊन अटक केली. अतिरेकी आहे का तो? दिल्लीसारखं मुंबईत सुरू झालं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महिलांवर हात टाकला जात आहे. खूप वाईट परिस्थिती आहे. ताब्यात घेतलेल्यांना सोडल्याशिवाय मी निघणार नाही.
