नवनाथ बनांच्या आरोपांना शिवराज मोरेंचं प्रत्युत्तर; व्हायरल व्हिडिओतील तरुणीही समोर, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Shivraj More On Navnath Ban Allegations: नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे आक्रमक झाले आहेत. माझी आणि बनांची नार्को टेस्ट करा, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले आहे.

भाजप नेते नवनाथ बन यांनी शिवराज मोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता शिवराज मोरेंनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच या आरोपांवर भाष्य केले आहे. यावेळी नवनाथ बन यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगीही समोर आली आहे. तिने त्या घटनेमागचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. तसेच शिवराज मोरेंनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
त्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना ती तरूणी म्हणाली की, मी शिवराज मोरेंच्या संपर्कात आली होती. त्यांनी मला मदत केली होती. त्यानंतर मी केपीमध्ये गेले असताना तो मुलगा परत आला. मला धमकी देऊन माझ्या अंगावर धावून आला. त्यामुळे मी घाबरली होती. त्यामुळे मी पोलीस आणि मोरेंना फोन केला. हे माझ्या भावासारखे आहेत. म्हणून शिवराज मोरेंकडे मी मदत मागितली होते. त्यानंतर ते मदतीला आले माझ्या. मी त्यासाठी त्यांना धन्यवाद बोलते. माझी त्यांनी मदत केली. पण यावरून जे राजकारण चालले आहे. त्यामुळे मला वाईट वाटत आहे, असं सांगत त्या तरूणीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. यानंतर शिवराज मोरेंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिला आहे.
शिवराज मोरे म्हणाले की, मी उपोषण संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे. त्यांना एक पत्र देणार आहे. माझी आणि नवनाथ बन यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी मी या पत्रातून करणार आहे. यामुळे कोण खरं बोलतं कोण खोटं हे सगळ्यांसमोर येईल. खोटं बोल पण रेटून बोल अशा तालमीत नवनाथ बन तयार झाले आहेत. ते संस्कार आमच्यावर नाही आहेत. आम्ही गांधीवादी विचारांची लोक आहोत.
शिवराज मोरे पुढे म्हणाले की, राजकारण करताना आमच्याकडूनही चुका होतात. पण अशा खालच्या पातळीला जाऊन कोणाचं चारित्र्य खराब करण्याचं काम आम्ही करणार नाही. नवनाथ बन यांनी जे आरोप केले ते मी खोडून काढले आहेत. या घटनेबद्दल त्यांना काही माहिती नव्हतं. पण महिलांना मदत करणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी अनेक वेळा करेन. पण कोणत्या महिलेला मदत करण्यास नकार देणार नाही. नवनाथ बन यांच्याविरोधात मी कारवाई करणार आहे, असं म्हणत त्यांनी बन यांनी फोडलेल्या व्हिडिओ बॉम्बेच्या आरोपांना उत्तर दिले आहे. तसेच सर्व आरोप खोडून काढले आहेत.