Eknath Shinde : एकदिवस हे घडणारच, भविष्यातील शिंदेंच्या एका महत्वाच्या राजकीय निर्णयाबद्दल शिरसाट यांनी आत्ताच सांगून टाकलं
"देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की महिला अत्याचाराच्या घटना, चिमुरडींवर होणारे अत्याचार यावर सरकार नराधमांना फाशीच देणार. फास्टट्रॅक कोर्ट मध्ये केस चालवणार. त्यामुळे सरकार लक्ष देत नाही असा विषय नाहीय" असं संजय शिरसाट म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे येणाऱ्या महिन्यांमध्ये काही महत्वाचे निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिवाळीआधी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होऊ शकतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार अशी माहिती आहे. पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. राज्य मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागू शकते. अशी सूत्रांची माहिती आहे. त्याशिवाय ऑपरेशन टायगरची राजकीत वर्तुळात चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर केलं जाणार असं सतत बोललं जातं. त्यावर मंत्री आणि पक्षाचे नेते संजय शिरसाट बोलले आहेत.
“ऑपरेशन टायगर केव्हा, कधी करायचं याची एकनाथ शिंदे साहेबांना कल्पना आहे. ज्या दिवशी गरज भासेल त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब ऑपरेशन टायगर यशस्वी करतील. उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहेत. एकदिवस हे घडणारच आहे. उद्धव ठाकरे गटाकडे आता ती ताकद राहिलेला नाही” असं संजय शिरसाट म्हणाले. त्याशिवाय सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणारे आमदार महेश शिंदे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते.
पण शिंदे साहेब वेळ देणार का?
यावर संजय शिरसाट म्हणाले की, “महेश शिंदे यांची नाराजी आहे, दोन दिवसांपुर्वी माझ्याशी त्यांचं बोलणं झालं. आम्ही त्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ घ्यावी आणि आपली भूमिका मांडावी. पण शिंदे साहेब वेळ देणार का? हा सुद्धा प्रश्न आहे”
“दिवाळीपुर्वी खांदेपालट होणार की शिंदे साहेब भाकरी फिरवणार हा निर्णय सांगून होत नाही तर जागेवर होतो. त्यामुळे दिवाळीनंतर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे” असं संजय शिरसाट म्हणाले.
आम्हालाच पक्ष चिन्ह मिळेल
“सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाचा विषय प्रलंबित आहे, यात पक्ष चिन्हा हे आम्हालाच मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. कुणी कुणाला कितीही भेटलं तरी आम्हालाच पक्ष चिन्ह मिळेल” असं संजय शिरसाट म्हणाले. “राज्यात महिला अत्याचाराच्या घटना या वारंवार वाढत आहेत. त्यामुळे कधी कधी तर मंत्री असून देखील आम्हाला असं वाटतं की या लोकांना भर चौकामध्ये शिक्षा द्यायला हवी”