
येत्या रविवारी १४ सप्टेंबरला आशिया कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरुन सध्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाकडून यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना म्हणजे पहलगामनंतरचा आणखी एक भयंकर ‘दहशतवादी’ हल्ला आहे. हा राष्ट्रद्रोहच आहे, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याला तीव्र विरोध करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. ‘‘जोपर्यंत कश्मीरात हिंदूंचे रक्त तुम्ही सांडत आहात तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट होणार नाही. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही!’’ असे ठणकावून सांगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे आणि पाकिस्तानशी क्रिकेटची सलगी करणारे आजचे नकली हिंदुत्ववादी कोठे? भारताचा स्वाभिमान आणि कुंकवाच्या प्रतिष्ठेसाठी जनतेला लढावेच लागेल, असे सामनातून नमूद करण्यात आले आहे.
मोदी सरकारच्या राजवटीत हिंदुत्व आणि राष्ट्रवाद सोयीनुसार वापरला जात आहे. देशभक्ती फक्त निवडणुका आणि मतांपुरतीच उरली आहे. जर असे नसते, तर १४ सप्टेंबरच्या सामन्याला परवानगी देऊन पहलगाम हल्ल्यातील जखमांवर मीठ चोळले नसते. पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचे बळी गेले असून, त्यांचे रक्त अजून सुकलेले नाही. तरीही मोदी सरकारने ‘जागतिक’ आणि ‘आंतरराष्ट्रीय’ नियमांचे कारण देत या सामन्याला परवानगी दिली, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची आणि ‘पाकव्याप्त काश्मीर’चा ताबा घेण्याची भाषा केली होती. आता सामनाने या घोषणेची आठवण करुन देत मोदी-शहांवर टीका केली आहे. पुसलेल्या कुंकवाचा बदला घेऊ म्हणणारे पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने का खेळत आहेत? भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने हे भारतीय महिलांच्या कुंकवाचा अपमान आहेत. क्रिकेट खेळणे महत्त्वाचे की पाकिस्तानला धडा शिकवणे महत्त्वाचे, असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यांमधून हजारो कोटींची आर्थिक उलाढाल होते. या उलाढालीचे सर्व लाभार्थी आता भाजपमध्ये आहेत. सिंधू नदीचे पाणी आणि भारतीयांचे रक्त एकत्र वाहणार नाही, असे मोदींनी म्हटले होते. तर मग क्रिकेट आणि भारतीयांचे रक्त एकत्र कसे चालेल. पाकिस्तानबरोबर अशा स्थितीत क्रिकेट मॅच खेळणे राष्ट्रविरोधी आहे. पाकिस्तानशी न खेळल्यास काहीही बिघडणार नाही, असा टोलाही सामनाने लगावला आहे.