
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सर्वत्र निषेध वर्तवण्यात आला. याप्रकरणी विरोधकांकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आले. आता याच घटनेवर सामनातून टीका करण्यात आली आहे. हिंदूचे राज्य म्हणजे अडाणी, धर्मांधांचे राज्य नाही, पण भारतीय जनता पक्षाने धर्मांध, अंधभक्त म्हणजेच हिंदुत्व हा विचार लोकांत रुजवला व राज्य केले. सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर हा अशाच अंधभक्तांचा बाप दिसतो, अशा शब्दात सामनातून घणाघात करण्यात आला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. या घटनेनंतर सामनातून भारतीय जनता पक्ष आणि अंधभक्तांवर सडकून टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून या कृत्याला संविधानावरील हल्ला असे म्हटले आहे. या कृत्याचा थेट संबंध संविधानावर होत असलेल्या हल्ल्याशी जोडण्यात आला आहे. सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानावर केलेला हल्ला आहे. हे कृत्य निंदनीय आणि बेशरमपणाचे आहे, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानावर केलेला हल्ला आहे. संविधान बदलाचा कट हाणून पाडल्यामुळे संविधानावर बूट फेकणे ही भाजप आणि संघ विचाराची विषवल्ली आहे. हे कृत्य निंदनीय आणि बेशरमपणाचे आहे. कोणताही खरा हिंदू असे बेशरम कृत्य करण्यास धजावणार नाही. सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील सनातनी हिंदू धर्माचा मारेकरी आहे, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.
यावेळी सामना वृत्तपत्रातून देशातील न्यायव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशातील न्यायव्यवस्था सडली आहे. तेथे खरा न्याय मिळणे कठीण झाले आहे. भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी न्यायासनापर्यंत पोहोचली आहे. न्यायालये मोदी-शहांच्या दबावाखाली काम करीत असल्याने लोकशाही, संविधानावर रोज राजकीय हल्ले सुरू आहेत. अनेक सरन्यायाधीशांनी निवृत्तीनंतर मोदी सरकारची नोकरी पत्करली आहे. कुणी राज्यपाल बनले, कोणी एखाद्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून विराजमान झाले. न्याय विकण्याचा हा प्रकार जोडे मारण्याच्या लायकीचा असताना सनातनच्या नावाने शिमगा करीत सरन्यायाधीश गवईंवर राग काढला गेला, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यामागे सनातन धर्माचा अपमान हे कारण देण्यात आले. गवई यांनी मध्य प्रदेशातील एका खंडित मूर्तीच्या पुनर्निर्माणाची याचिका फेटाळताना याचिकाकर्त्याला तुम्हीच ईश्वराकडे जा आणि काही करण्यास सांगा, इथे कायद्याप्रमाणेच न्याय होईल असे भाष्य केले होते. यावर भावना दुखावल्याचे लक्षात येताच गवई यांनी खेद व्यक्त केला होता. अखेर गवई यांनी त्या बूट फेकणाऱ्याला माफ केले आणि त्याचा बूट परत करताना ‘या बुटाचा सदुपयोग करा व ज्यांची जोडे खायची लायकी आहे, त्यांनाच मारा’ असे सूचवायचे असावे, असे मत अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे.