कुंभमेळा नाशकात, बजेट महाराष्ट्र सरकारचे, पण सर्व पैसा गुजरातकडे…; सामनातून घणाघात

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवरून वाद निर्माण झाला आहे. २५ हजार कोटींच्या बजेटसह साधुग्रामसाठी होणारी संभाव्य वृक्षतोड आणि रस्ता रुंदीकरणामुळे स्थानिकांचे विस्थापन हे प्रमुख मुद्दे आहेत. सामनातून सरकारवर टीका झाली असून, सर्व ठेके गुजरातच्या ठेकेदारांना मिळत असल्याचा आरोप आहे. पर्यावरणवादीही वृक्षतोडीला विरोध करत आहेत. हा कुंभमेळा नाशिकच्या भूमिपुत्रांवर संकट ठरत आहे.

कुंभमेळा नाशकात, बजेट महाराष्ट्र सरकारचे, पण सर्व पैसा गुजरातकडे...; सामनातून घणाघात
samana sanjay raut
| Updated on: Nov 30, 2025 | 8:02 AM

नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सध्या जय्यत तयारी सुरु आहे. येत्या ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण करुन कुंभ पर्वाला सुरुवात होणार आहे. तर यातील पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला पार पडले. यासाठी सरकारकडून सध्या जय्यत तयारी केली जात आहे. याच कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित वृक्षतोड केली जाणार आहे. यावरुनच सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या साधुग्रामसाठी दोन हजारांवर झाडांची कत्तल होत आहे. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली स्थानिक भूमिपुत्रांची घरे व व्यवसायांवर बुलडोझर चालवले. यात श्रीरामांची करुणा, सत्य, संयम कोठेच दिसत नाही, अशी टीका सामना रोखठोकमधून करण्यात आली.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या रोखठोक सदरातून नाशिकच्या कुंभमेळ्यावर टीका करण्यात आली. २५ हजार कोटी रुपयांचे बजेट, साधुग्रामसाठी होणारी संभाव्य वृक्षतोड आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांवर फिरणारा बुलडोझर या तीन प्रमुख मुद्द्यांवरून हा वाद रंगला आहे. नाशिक कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने २५ हजार कोटी रुपयांचे मोठे बजेट मंजूर केले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी मंजूर झालेला हा सर्व पैसा महाराष्ट्रातील स्थानिकांऐवजी शेवटी गुजरातच्याच ठेकेदारांकडे जाईल. प्रयागराजमध्येही गुजरातच्या ठेकेदारांनाच कामे मिळाली होती, असा दावा रोखठोकमधून करण्यात आला आहे.

नाशिक कुंभमेळ्याचे बहुतेक सर्व ठेके गुजरातच्याच लोकांना

नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारने 25 हजार कोटींचे बजेट मंजूर केले आहे. प्रयागराज कुंभमेळ्याचे बजेट 20 हजार कोटी होते. रस्ते, स्वच्छता, नदीतल्या बोटी, सुरक्षा, साधूंची व्यवस्था, श्रद्धाळूंची व्यवस्था यावर हा खर्च होतो. प्रयागराजमधील या सर्व कामांचे ठेके गुजरातच्या लोकांना मिळाले. हे ठेके गुजरातच्याच लोकांना मिळावेत यासाठी उत्तर प्रदेश प्रशासनावर दबाव होता. आता नाशिकच्या कुंभमेळ्याचे सूत्रधार मंत्री गिरीश महाजन आहेत. 25 हजार कोटी कुंभमेळ्याचे म्हणून त्यांच्या खिशात आहेत. नाशकातदेखील सध्या गुजरातच्या ठेकेदारांचा वावर वाढला आहे. म्हणजे नाशिक कुंभमेळ्याचे बहुतेक सर्व ठेके गुजरातच्याच लोकांना दिले जातील. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन व त्यांचे लोक या ठेक्यातून फार तर मोठी टक्केवारी वसूल करतील. कुंभमेळा नाशकात, बजेट महाराष्ट्र सरकारचे, पण हा सर्व पैसा शेवटी गुजरातचे ठेकेदार घेऊन जाणार आहेत, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

नाशिकच्या तपोवन परिसरात कुंभमेळ्याच्या तयारीसाठी दोन हजार झाडे तोडली जाणार आहेत. ही झाडे तोडून तेथे साधुग्राम उभे करण्याची योजना आहे. ही झाडे तोडण्यास पर्यावरणवादी विरोध करीत आहेत. कुंभमेळा येईल आणि जाईल. साधू येतील व जातील. त्यासाठी नाशिक असे उजाड का करता? असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

कुंभमेळा कोणते धर्मकार्य पार पाडणार आहे?

रुंदीकरणाच्या नावाखाली नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम या सरकारने सुरू केले. रस्त्याच्या दुभाजकापासून दोन्ही बाजूला 50 मीटरचे रुंदीकरण केले जाणार आहे. पिंपळगाव, बहुला, बेळगाव ढगा, महिरावणी, तळेगाव, अंजनेरी, खंबाळे, पेगलवाडी अशा गावांतील लोकांची घरेदारे, व्यवसाय या रुंदीकरणात उद्ध्वस्त होत आहेत. सिंहस्थ कुंभमेळा नाशिकच्या भूमिपुत्रांवर संकट बनून कोसळला आहे. नाशिकच्या स्थानिक लोकांना अशा प्रकारे निराधार, बेरोजगार करणारा कुंभमेळा कोणते धर्मकार्य पार पाडणार आहे? असा सवालही रोखठोकमधून उपस्थित करण्यात आला आहे.