पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांची जबाबदारी गृहमंत्रालयाची, अमित शहांनी राजीनामा द्यावा; ठाकरे गटाची मागणी
शिवसेना ठाकरे गटाने पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांना जबाबदार धरले आहे. सामनाच्या अग्रलेखात या हल्ल्यांना सरकारची बेफिकिरी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांनी स्वतःच सुरक्षेतील कमतरता कबूल केल्याने शिवसेनेने शहा यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. २६ आणि ४० जवानांच्या बळीमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीचा उल्लेख करून शिवसेनेने सरकारवर तीव्र टीका केली आहे.

“जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आणि पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी केंद्र सरकार आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. ही दोन्ही हत्याकांडे सरकारच्या बेफिकिरीमुळे घडली. तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक व आताचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनीच हत्याकांडाची जबाबदारी सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्रालयावर टाकली. या दोन्ही हत्याकांडांची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांचीच आहे हे राज्यपाल सांगतात तेव्हा गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा, आधी जम्मू–कश्मीरच्या राज्यपालांना बडतर्फ करा व तुम्ही स्वतःही राजीनामा द्या”, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.
देशाच्या गृहमंत्रालयाची लक्तरे वेशीला टांगली गेली
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. “जम्मू आणि कश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी कबूल केले आहे की, पहलगाम हल्ला ही सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक होती. या हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. हल्ल्यानंतर भाजपने हिंदू-मुसलमानांमध्ये तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिकांनी जखमींना आणि पर्यटकांना मदत करून तो प्रयत्न हाणून पाडला. जम्मू-कश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा काढून तो केंद्रशासित प्रदेश बनवल्यामुळे, तेथील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी थेट केंद्र सरकार म्हणजेच गृहमंत्रालयाची आहे. राज्यपाल सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळेच अतिरेकी पर्यटकांपर्यंत पोहोचू शकले आणि हल्ला करू शकले. यामुळे देशाच्या गृहमंत्रालयाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत”, असा घणाघात सामनातून करण्यात आला.
हे संपूर्ण प्रकरण सदोष मनुष्यवधाचे
“या २६ जणांच्या हत्याकांडास जबाबदार असलेले आरोपी अद्यापही पकडण्यात आलेले नाहीत. याबद्दल कोण जबाबदारी घेणार? गृहमंत्री अमित शाह आणि जम्मू-कश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांना त्यांच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. हे संपूर्ण प्रकरण सदोष मनुष्यवधाचे आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. गुप्तचर संस्थांनी रस्तामार्गे सैन्य नेणे धोकादायक असल्याची माहिती दिली असतानाही गृहमंत्रालय गाफील राहिले. तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जवानांसाठी विमानाची मागणी केली होती, पण गृहमंत्रालयाने ती नाकारली. या घटनेसाठी गृहमंत्रालय कुचकामी ठरले किंवा जैश-ए-मोहम्मदचा एखादा व्यक्ती गृहखात्यात बसला आहे”, असा गंभीर आरोप अग्रलेखातून करण्यात आला.
अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा
“मणिपूरपासून कश्मीरपर्यंत या बेफिकिरीची रोजच प्रचीती येत असल्याचे म्हटले आहे. पुलवामा आणि पहलगाम ही दोन्ही हत्याकांडे सरकारच्या बेफिकिरीमुळेच घडली. नरेंद्र मोदी, अमित शहा हे व्यापारी वृत्तीचे बेफिकीर राज्यकर्ते आहेत. मणिपूरपासून कश्मीरपर्यंत या बेफिकिरीची रोजच प्रचीती येते. सुरक्षेबाबत बेफिकिरी जशी पहलगाममध्ये झाली तशी ती 2019 साली पुलवामा हल्ल्यात 40 भारतीय जवान मारले गेले तेव्हाही झाली. गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा. जम्मू-कश्मीरच्या राज्यपालांना बडतर्फ करावे”, अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे.
