सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत; तातडीच्या बैठकीत काय घडलं?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाने वरळीत डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. सर्व विभाग प्रमुख, सर्व शाखा आणि इतर पदाधिकारी या बैठकीला हजर होते.

सचिन अहिर फुटताच ठाकरे सेनेत मोठ्या घडामोडी, दोन शिलेदार थेट वरळीत; तातडीच्या बैठकीत काय घडलं?
Sunil Shinde and Sachin Ahir
Image Credit source: Google
| Updated on: Jun 30, 2026 | 10:41 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही काळापासून मोठे हादरे बसत आहेत. गेल्या आठवड्यात 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर आज विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. या बड्या धक्क्यानंतर आता ठाकरे गटाने वरळीत डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. सर्व विभाग प्रमुख, सर्व शाखा आणि इतर पदाधिकारी या बैठकीला हजर होते. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत काय घडलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाल्या पेडणेकर?

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, ‘आज या ठिकाणी सच्चे शिवसैनिक आहेत. अगदी शाखेपासून काम करत आहेत, विभाग प्रमुख देखील आहेत. संजय कदम यांच्या तालमीत आम्ही तयार झालो. नारायण राणे फुटले तेव्हा देखील आम्ही होतो, मागून येऊन अनेक जणांना खूप दिलं, जुन्या लोकांना पान पुसली. मी अनेक वेळा सांगितलं, काय आहे, कोण आहे नीलम गोऱ्हे? काय तिच्यात? संजय राऊत यांनी काय कमी केलं. आपल्याला बोलले हे टायगर गेले. हे लोक बोकड आहेत.’

फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे

पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, ‘आता सगळं फोडा फोडीच राजकारण सुरू आहे, सगळा चिखल झाला आहे. आपण पक्षात एकत्र आलं पाहिजे. कुठे काय असलं तर त्याचा बाहेरचा फायदा घेतो. बाहेर जाऊन वेगळं काही बोलू नका. सचिन अहेर यांना भावा सारखे प्रेम दिले पण तुम्ही असे वागले, सचिन आहेर हे पांढऱ्या पायाचे आहेत ते आले आणि सत्ता गेली. पण आता आपल्याला एकत्र यायचं आहे.’

आमदार सुनील शिंदे यांनी म्हटले की, आज आपण इथे एकत्र आलो. हे फुटून गेले पण आपण एकत्र आहोत. ते आले होते तेव्हा ते गद्दारी करून आलेले. आज आदित्य ठाकरे यांना बोललो की नका येऊ बैठकीला, तुमच्या कडे अनेक विषय आहेत . कार्यकर्त्यांशी बोललां पाहिजे म्हणून ही बैठक आहे. या ठिकाणी सगळे लोक आदित्य ठाकरे यांना निवडणूक देणारे आहेत. निवडणुकीत आमच्या विरोधात देखील राजकारण केलं पण लोकांनी आदित्य ठाकरे यांना निवडून दिलं.

कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर…

सुनील शिंदे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘हा मतदार संघ बाळासाहेब यांचा आहे. आक्रमक शिवसैनिक या ठिकाणी आहेत. अजूनही आमच्याकडे अनेक चेहरे आहेत जे आमदार होऊ शकतात. आतापर्यंत सगळी महत्वाची पद त्यांचा मिळत होती पण कार्यकर्त्यांना समजवण्याचं काम आम्ही करायचो. आदित्य ठाकरे फक्त माझाच ऐकतात असे सांगायचं आणि फटाफूट करायचे. नगरसेवकच तिकीट देतो, नगरसेवक बनवतो असं सांगून फूट पडण्याची काम शाखेत केली. पण आज माझा शिवसैनिक इथे आहे आणि कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही.’

Follow Us