
निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राज्यातील नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकांचे विघ्न काही संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या मतदानाचा निकाल उद्या ३ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार होता. मात्र आता हा निकाल लांबणीवर पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नगरपालिका आणि नगरपरिषदेचे सर्व निकाल 21 डिसेंबरपर्यंत जाहीर करु नका, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता उमेदवारांसह सर्वसामान्यांना निकालासाठी 21 डिसेंबर पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. आता यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता यावर ठाकरे गटाचे सर्वसर्वो उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरु असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर केला जाणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग आणि न्यायालय यावर न बोलेलंच चांगलं, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मातोश्रीवर पक्षप्रवेश कार्यक्रम सुरु असून अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले पक्षात परत येणाऱ्यांचे स्वागत आहे असं म्हणत समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षप्रवेश सुरू आहे. धुळफेक केलेली आणि कट्टर शिवसैनिक हे परत येतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी हवेसारखं राजकारणातही प्रदूषण झाल्याचं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. दगाबाज भाजपला धडा शिकवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना केली. सध्या सत्तेसाठी सगळी लाचारी चालली आहे. हवेत प्रदूषण आहे तसे राजकारणात आहे. काँग्रेस बरोबर गेले. उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा करून धुळफेक करण्याचे काम केले, अजित पवार निधी देत नाही, अशी अनेक कारणे ठाण्याची लोक देतात. मला शिव्या घालत होते. आज त्यांचेच फोटो सोनिया गांधींसोबत आहेत,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.
आजही ठाण्यात शिवसेनेची वट आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे काम तुम्हाला करायचं आहे. भगव्यावर कोणतही चित्र छापू नका, तो शिवरायांचा आहे, तो पवित्र आहे, तो तसाच फडकला पाहिजे. मशाल घेऊन पुढे चला, मशालीच्या तेजाने सर्व जळमट जळून खाक होईल. इतरांनी जे केले ते तुम्ही करू नका, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.