बा देवा महाराजा, पुन्हा एकदा… महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी घातलं गाऱ्हाणं, नक्की काय म्हणाले?

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागाठाणे येथील मालवणी महोत्सवातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले. २०१२ च्या आठवणींना उजाळा देत त्यांनी पुन्हा शिवसेनेचा महापौर व्हावा, असे भावनिक आवाहन केले.

बा देवा महाराजा, पुन्हा एकदा... महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी घातलं गाऱ्हाणं, नक्की काय म्हणाले?
uddhav thackeray
| Updated on: Nov 02, 2025 | 11:15 AM

सध्या राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. येत्या ४ किंवा ५ नोव्हेंबरला महापालिका निवडणुकांची घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागाठाणे येथील मालवणी महोत्सवाच्या व्यासपीठावरून कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. यावेळी उद्धव ठाकरेंनी २०१२ च्या आठवणींना उजाळा देत येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचा महापौर व्हावा, यासाठी देवाकडे गाऱ्हाण घातलं.

तसंच गाऱ्हाणं आताही आपल्या देवाला घातलेलं आहे

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मागाठाणे येथील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत केली. २०१२ ला आपण इथं गाऱ्हाणं घातलं होतं की मुंबईचा महापौर होऊ दे. त्यानंतर सुनील प्रभू महापौर झाले. सुनील प्रभू हे २०१२ मध्ये महापौर झाले होते. पुढचं मी सांगत नाही, पण तसंच गाऱ्हाणं आताही आपल्या देवाला घातलेलं आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यामुळे सर्वांनी सावध राहिलं पाहिजे

मला विश्वास आहे बाकी कोणी ऐकू न ऐको, पण देव आपलं ऐकतो. मी मनापासून बोलतोय, खोटं बोलायचं म्हणून बोलत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केवळ उत्साही न राहता राजकीय परिस्थितीबद्दल जागरूक आणि सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले. आपला मोर्चा झाला. त्यामुळे सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. अन्यथा मुंबईत जेवढे दिसतोय, तेवढे पण पुढील पाच वर्षात दिसणार नाहीत…” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

तीच जिद्द आणि हिंमत आपल्याला वेतोबाने दिली आहे

जुने कार्यकर्ते या ठिकाणी दिसतायत. अजूनही काही आपली माणसं धडपड करत आहेत. संघर्ष म्हटला की मराठी माणूस मागे हटत नाही. अंगावर आलं तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. तीच जिद्द आणि हिंमत आपल्याला वेतोबाने दिलेली आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान मागाठाणे येथील शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवाचा उद्देश केवळ सांस्कृतिक असला तरी, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमुळे याला राजकीय सभेचे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना भावनिक आधार देत आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.