
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील अशा बातम्या सातत्याने येत आहेत. ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या चर्चांवर आता उद्धव ठाकरे यांनी थेट भाष्य केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीबद्दल सूचक विधान केले. “बातम्या सुरू आहेत. काय होणार? कसलं? होणार का? होणार की नाही होणार, कळेल ना. राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले. हॉटेलात भेटतात. मालकाचे नोकर तुम्ही, जर का मुंबईवर ताबा मिळाली नाही. मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आली . अरे आम्ही घेणारच आहोत. मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर,. आणि नालायकपणे वर्धापन दिन साजरा करणारे शेठजीच्या नोकरांचे नोकर आहेत. तुला काय करायचं तुला नाही होत आमचं आम्ही पाहू”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर थेट हल्ला चढवला. “काय करायचं ते. जर तुम्हाला वाटत असेल तर शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल, तर तुमचं नामोनिशाण महाराष्ट्राच्या धर्तीवरून मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही. भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू. आज तर मी तयारीने उभा आहे.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरेंनी १९९२-९३ च्या मुंबई दंगलीची आठवण करून देताना एक किस्सा सांगितला. “९२-९३ साली जेव्हा दंगा भडकला होता, तेव्हा तुम्हीच रस्त्यावर उतरला होता. तेव्हा एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब आता बस्स झालं. पुरे झालं. ती व्यक्ती कोण सांगणार नाही. ते हयात आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.