बाप चोर, बापाची पोरंही चोर… बापाकडून बंद घरांची रेकी, मुलांकडून घरफोडी; कल्याणमध्ये पकडली फॅमिली गँग

कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे वडीलच आपल्या मुलांकडून घरफोड्या करून घेत होते. बंद घरांची रेकी करून ते मुलांना माहिती पुरवत आणि मुले चोरी करत. पोलिसांनी या भयानक टोळीचा पर्दाफाश करत, दोन पित्यांसह एकूण तिघांना अटक केली. २१ लाख ६० हजार रुपयांचे १८ तोळे सोन्याचे दागिने जप्त करत, कल्याण परिसरातील ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

बाप चोर, बापाची पोरंही चोर... बापाकडून बंद घरांची रेकी, मुलांकडून घरफोडी; कल्याणमध्ये पकडली फॅमिली गँग
कल्याणमध्ये पकडली फॅमिली गँग
| Updated on: May 16, 2026 | 1:41 PM

आपली मुलं खूप शिकावीत, मोठी व्हावीत, यशस्वी व्हावीत, त्यांनी चांगलं नाव कमवावं अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असतात. आई-वडील मुलांना चांगल्या मार्गावर चालण्याची शिकवण देतात, मात्र कल्याणमध्ये एक धक्कादायक आणि विपरीत प्रकार घडल्याचते समोर आलं आहे.वडिलांनी स्वतः वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये फिरून बंद घरांची ‘रेकी’ करायची आणि त्याची माहिती पोटच्या मुलांना देऊन त्यांच्याकडून घरफोड्या करून घ्यायचं, असा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, चोरीच्या कारवाया करणाऱ्या या भयानक टोळीचा कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन पित्यांसह एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल 21 लाख 60 हजार रुपये किमतीचे 18 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, कल्याण परिसरातील घरफोडीचे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

कल्याण पश्चिमेकडील घरफोडीने लागला चोरांचा सुगावा

रामबाग लेन नंबर ४ येथील रहिवासी एम. अरविंद राजाराम पै (वय 49) यांच्या बंद घरात 8 मे 2026 रोजी अज्ञात चोरांनी डल्ला मारला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलिसांच्या तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 13 मे 2026 रोजी कैलास विलास भालेराव (वय 19, रा. मोहने, आंबिवली) याला अटक केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या १४ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. या दोन्ही मुलांना भिवंडीच्या बाल न्यायालयात हजर करून बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

वडीलच होते मास्टरमाईंड

मुख्य आरोपी कैलास भालेराव याची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण गुन्ह्यामागचा मास्टरमाईंड त्याचे वडील आणि त्यांचे मित्र असल्याचे समोर आले. अटक केलेला मुख्य आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाचे वडील विलास भालेराव (वय 38, व्यवसाय- साफसफाई) आणि दीपक जाधव (वय 40, व्यवसाय- बिगारी) हे दोघेही वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये काम करत असताना बंद घरांची रेकी करायचे. कोणत्या सोसायटीत कोणते घर बंद आहे, याची इत्यंभूत माहिती ते आपल्या मुलांना पुरवायचे. वडिलांनी दिलेल्या ‘टिप’नुसार ही मुले त्या सोसायटीत जाऊन कडी-कोयंडा तोडून घरात घुसायची आणि मुद्देमाल चोरायची.

मौजमजेसाठी चोरी, दागिने विकायचे वडील !

चोरी करून आणलेली रोख रक्कम ती मुलं स्वतःच्या मौजमजेसाठी उडवायची, तर चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विलास भालेराव आणि दीपक जाधव यांच्याकडे आणून द्यायची. हे दोन्ही पिता मिळून त्या दागिन्यांची विक्री करायचे. पोलिसांनी तत्परता दाखवत या दोन्ही आरोपी पित्यांना 15 मेच्या रात्री आंबिवली परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

एकूण 4 गुन्हे उघड, 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपी कैलास भालेराव कडून अत्यंत कौशल्याने तपास केला असता, त्यांनी कल्याण परिसरात आणखी 3 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील एकूण 4 गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून पोलिसांनी 1 मंगळसूत्र, 2 गंठण, 3 सोन्याच्या बांगड्याअसे एकूण 18 तोळे वजनाचे 21, 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us