आता आमदारांवर मोठी जबाबदारी, प्रत्येक तालुक्यात…; श्रीकांत शिंदेंकडून नव्या फॉर्म्युल्याची घोषणा, कार्यकर्त्यांचेही टोचले कान

जळगावच्या शिवसंवाद दौऱ्यादरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी अमळनेर येथील बैठकीत पक्षांतर्गत गटबाजीवरून कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली, तसेच आमदारांसाठी एका नव्या फॉर्म्युल्याची घोषणा केली.

आता आमदारांवर मोठी जबाबदारी, प्रत्येक तालुक्यात...; श्रीकांत शिंदेंकडून नव्या फॉर्म्युल्याची घोषणा, कार्यकर्त्यांचेही टोचले कान
Shrikant Shinde
| Updated on: Jun 07, 2026 | 12:41 PM

सध्या महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपपली मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या शिवसंवाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अमळनेर येथील आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. छोट्या-मोठ्या गोष्टी आणि वैयक्तिक गर्व बाजूला ठेवला पाहिजे. मी मोठा की तू मोठा या गोष्टी बाजूला ठेवून काम करा, हे काय लक्षात ठेवले पाहिजे, अशा कडक शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांचे कान टोचले.

कार्यकर्त्यांनी अधिक गांभीर्याने काम करा

श्रीकांत शिंदे यांनी शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित या बैठकीत त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी आणि गर्वावरून जाहीर नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना हा एक ताकदवर पक्ष राहिलेला आहे. जर पक्ष आगामी काळातही तितकाच मजबूत आणि ताकदवर ठेवायचा असेल, तर आता कार्यकर्त्यांनी अधिक गांभीर्याने काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.

शिवसंवाद दौऱ्याच्या उद्देशावर बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, कुठल्या मतदारसंघात आपली नेमकी किती ताकद आहे, हे या दौऱ्यामुळे स्पष्ट होते. त्यानुसार आपण कुठे निवडणूक लढू शकतो, हे ठरवता येते. आता कोणाला काही वेगळे सांगण्याची गरज नाही; कुठे आपली किती ताकद आहे याचे दूध का दूध आणि पाणी का पाणी या दौऱ्यात स्पष्ट होणार आहे. कोण जिल्हाप्रमुख किती काम करतो आणि कोण तालुकाप्रमुख किती सक्रिय आहे, याची संपूर्ण माहिती या बैठकांच्या माध्यमातून समोर येत आहे, असेही त्यांनी म्हटले.

आमदारांवर सोपवणार नवी जबाबदारी

तसेच पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात एक नवा फॉर्म्युला राबवला जाणार आहे. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यातील सातही आमदारांना पालक आमदार म्हणून प्रत्येक तालुक्याची विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक नगरसेवक, कार्यकर्ता तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांची कामे वेळेवर होतील. तसेच जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Follow Us