मोठी बातमी ! कोकणात ऐतिहासिक निर्णय, वाड्या,रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली, आता…

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. येथील १९२ वस्त्या आणि २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून ती आता महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित करण्यात आली आहेत. जातीवाचक नावे बदलणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. या निर्णयामुळे सामाजिक ऐक्याला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

मोठी बातमी ! कोकणात ऐतिहासिक निर्णय, वाड्या,रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली, आता...
| Updated on: Oct 14, 2025 | 10:53 AM

कोकणात एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला असून आता या रस्त्यांना महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नवी नावे देण्यात आली आहे. रस्त्यांची जातीवाचक नावं बदलणारा सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. सिंधुदुर्गमधील एकूण 192 वस्त्या तसेच 25 रस्त्यांची नावे बदण्यात आली आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे “हरिजन वाडी”, “चर्मकार वाडी”, “बौद्ध वाडी” अशी जातीवाचक नावे इतिहासजमा झाली असून आता सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहरी आणि ग्रामीण भागात हरिजन वाडी, जाधव वाडी, चर्मकार वाडी, बौद्ध वाडी अशा जातिवाचक नावांनी कोणतेच रस्ते आणि वाड्यांचा उल्लेख होणार नाही. जिल्ह्याच्या सामाजिक ऐक्याला बळकटी देणारा हा निर्णय ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील, शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावं आहेत. जुलै महिन्यात अनुसूचित जातीसाठी आयोजित करण्यात आलेल्या समाज संवाद आणि तक्रार निवारण जनता दरबारात पालकमंत्री राणे यांच्याकडे सामूहिक मागणी प्रलंबित असल्याची बाब निर्दशनास आणून देण्यात आली. त्यानंतर ही जातीवाचक नावे बदलून महापुरूषांची आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नावे देण्यासंदर्भात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील निर्णय घेतला. या नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण 192 जातीवाचक वस्त्यांची आणि 25 जातीवाचक रस्त्यांची नावे बदलण्यासाठी ग्रामसभेचा ठराव पास करण्यात आला. त्यानंतर त्यासंबंधीचा प्रस्ताव हा गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला.

सदर प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आले होते. शासन निर्णयान्वये जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १९२ वस्त्यांची व २५ रस्त्यांची जुनी जातीवाचक नावे बदलून ग्रामसभा ठरावत प्रस्तावित केलेली नावे शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे प्राप्त अहवालानुसार या आदेशाद्वारे जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्यात आली आहे.