
आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंचा पक्ष मनसे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुटुंबातील सूनबाई स्मिता ठाकरे यांनी या युतीवर भाष्य केलं आहे. साहेब असताना जर दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता असं त्यांनी म्हटले आहे. स्मिता ठाकरे नेमकं काय म्हणाल्या ते जाणून घेऊयात.
स्मिता ठाकरे या त्यांच्या मुक्ती फाउंडेशनच्या वतीने मुलांना अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी जुहू येथील एका शाळेत गेल्या होत्या. यावेळी बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या की, ‘आओ भूक मिटाओ मी हे अभियान सुरू केलेले आहे. झोपडपट्टीतील मुलांना मी अन्न वाटप करते. आमच्या आई आणि वडिलांचे संस्कार आहेत, जर कोणी आला तर त्याला पोट भरून देतो. मी आणि माझी दोन मुले माझ्याबरोबर मुक्ती फाउंडेशन मध्ये आहे. समाजसेवाची भावना प्रत्येक तरुणामध्ये असावी अशी माझी इच्छा आहे.
राजकारणात प्रवेश करण्याबाबत बोलताना स्मिता ठाकरे म्हणाल्या की, आतापर्यंत माझा राजकीय प्रवास सुरू झालेला नाही. मी कुठल्याही पक्षामध्ये सहभागी झालेली नाही. जोपर्यंत साहेब होते तोपर्यंत मी साहेबांबरोबर जोडलेली होती. जे काही मार्गदर्शन त्यांनी केलं होतं, त्याच्यामुळेच आज मुक्ती फाउंडेशन स्थापन करू शकले. कुठलाही राजकीय पक्ष किंवा सरकारकडून अजून मला कुठलाही मदत मिळालेली नाही आहे. माझी ओळख एक समाजसेविका म्हणून आणि एक फिल्म मेकर म्हणून आहे. ठाकरे आडनाव असल्यामुळे मी राजकारणात जायला पाहिजे असं कुठे काही लिहिलेले नाही. माझे सासऱ्याचे वडील जे होते, तेही नाटकात काम करत होते, फिल्ममध्ये काम करत होते, तीच भूमिका मी घेतलेली आहे.
स्मिता ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, दोघेजण एकत्र आलेत ही कुटुंब म्हणून खूप चांगली गोष्ट आहे.पण माझी एवढीच भावना आहे की जर साहेब असताना असं झालं असतं तर त्यांना खूप आनंद झाला असता. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने काय परिणाम होतील हे मी सांगू शकत नाही.