अंजली दमानियांच्या हिटलिस्टवर आता चार मंत्री, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांकडे गुंडगिरी थांबवण्याची मागणी केली आहे.

अंजली दमानियांच्या हिटलिस्टवर आता चार मंत्री, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
anjali damania
| Updated on: Jul 21, 2025 | 8:08 AM

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांचे व्हिडीओ समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांचा कॅटीन कर्मचाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडताना दिसत आहे. रम्मी मास्टर कृषीमंत्री, शेतकऱ्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी, असा टोला विरोधकांकडून लगावला जात आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांकडे एक मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस आता तरी ही गुंडगिरी थांबवा, अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे.

अंजली दमानिया यांनी नुकतंच ट्वीटरवर दोन पोस्ट केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी मंगळवारी २२ जुलै रोजी दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले आहे. या पत्रकार परिषदेत त्या सूरज चव्हाण यांच्या तातडीने अटकेची मागणी करणार आहेत. त्याचबरोबर, संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करण्याची मागणी करत याविरोधात लढा उभारण्याची घोषणाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

“आता ही गुंडगिरी बास. सूरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. कृषी मंत्री अधिवेशनात ऑनलाईन पत्ते खेळत असताना लोकांनी याविरोधात निषेध व्यक्त केल्यास त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

ते सूरज चव्हाण ….. ह्या माणसाची इतकी मजल की, ह्या घटनेनंतर ते एका मराठी चॅनेल शी बोलतांना म्हणतात की त्या लोकांनी ‘असंविधानिक’ भाषा वापरली? म्हणून तुम्ही मारहाण करणार? मग मारहाण करणे हे कृत्य संविधानिक आहे? तुम्हाला संविधान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? तातडीने त्या सूरज चव्हाणांची पदावरून हकालपट्टी करा. मुख्यमंत्री फडणवीस….. आता तरी थांबवा ही गुंडगिरी”, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

सूरज चव्हाण यांचे आरोप काय?

दरम्यान महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले होते की, “धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे. काहीही काम न करता वर्षाला १५ देश फिरणाऱ्या अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या “स्वयंघोषित” समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला पुराव्यासह ….लवकरच, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर नवा वादही निर्माण झाला होता.