
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपहरण झालेल्या कार्यकर्त्याला सुखरूप सोडवलं. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अमित सुरवसेसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली. आता या घटनेनंतर शरणु हांडे यांनी नेमंक काय घडलं, याबद्दलची माहिती दिली.
शरणू हांडे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. नुकतंच त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद झाला. यावेळी त्यांना ही घटना नेमकी कशी झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? किती वाजता घडली, वेळ काय होती याबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी शरणू हांडे यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.
“मी पानटपरी जवळ उभा होतो. अचानक एक गाडी आली आणि त्यातून काही लोक उतरले. त्यांनी थेट माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्यांनी मला मारहाण केली. यानंतर गाडीत कोंबले. त्यानंतर माझे पाय बांधले. ते मला कुठेतरी घेऊन जात होते. ते एकूण सात लोक होते. त्यांच्या हातात कोयते, हॉकी स्टिक आणि तलवार अशी धारदार हत्यारं होती. गाडीतही मला सतत मारहाण करत होते. त्यामुळे मला कुठे घेऊन जात आहेत हे मला कळलं नाही.” असे शरणू हांडे यांनी म्हटले.
हे अपहरण जुन्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचं समोर आलं आहे. आरोपी अमित सुरवसे याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. काही दिवसांपूर्वी याच घटनेचा बदला घेण्यासाठी शरणु हांडे यांनी अमित सुरवसेला मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या अपमानाचा राग मनात ठेवूनच अमित सुरवसेने हे अपहरण करून बदला घेण्याचा कट रचला.
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ चार पथके तयार केली. तसेच कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी केली. रात्री १० च्या सुमारास पोलिसांनी होर्टी गावाजवळ आरोपींना पकडण्यात आले. यावेळी शरणु हांडे गाडीत गंभीर जखमी अवस्थेत सापडले. पोलिसांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सोलापूरला आणले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.