आता मला माझा पर्याय काढावा लागेल… शरद पवार गटाचा बडा नेता सोडणार साथ; मविआची डोकेदुखी वाढली

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी अधिकृत उमेदवार वसंत देशमुख यांच्या विरोधात बंडखोरीचे संकेत देत 'वेगळा पर्याय' निवडण्याचा इशारा दिला आहे.

आता मला माझा पर्याय काढावा लागेल... शरद पवार गटाचा बडा नेता सोडणार साथ; मविआची डोकेदुखी वाढली
sharad pawar
| Updated on: Jun 09, 2026 | 8:42 AM

राज्यतील विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीत विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील मोठी अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. माढ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवर अत्यंत गंभीर आक्षेप घेत बंडखोरीचे थेट संकेत दिले आहेत. पक्षाने आपल्याला विश्वासात न घेता वसंत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली, असा आरोप अभिजीत पाटील यांनी केला. आता मला माझा पर्याय काढावा लागेल, असा थेट इशारा अभिजीत पाटील यांनी दिल्याने शरद पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

पक्षाने आणि मोहिते-पाटलांनी विचारातच घेतले नाही: आमदार पाटील

आमदार अभिजीत पाटील यांनी नुकतंच पक्षांतर्गत हुकूमशाहीवर जाहीर नाराजी व्यक्त केली. वसंत देशमुख यांची उमेदवारी जाहीर करताना पक्षाने मला साधे विचारातही घेतले नाही. कोणतीही माहिती न देताच पक्षाने देशमुखांना उमेदवारी दिली. एवढेच नव्हे तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीलाही मला बोलावले नाही. पक्ष उमेदवार देणार आहे, हेच मला माहिती नव्हते. अगदी अर्ज भरतानाही याविषयी पूर्ण अंधारात ठेवण्यात आले, असा गंभीर आरोप अभिजीत पाटील यांनी केला आहे.

‘तुतारीचा उमेदवार पाडणाऱ्यांना आम्ही मत का द्यायचे?’

यावेळी अभिजीत पाटील यांनी उमेदवाराच्या निष्ठावंतावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. पंढरपूर येथील जुन्या राजकीय घडामोडींचा दाखला देत ते म्हणाले, पंढरपूरच्या सभापती पदाच्या निवडीवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या याच वसंत देशमुखांनी पक्षाशी गद्दारी करत तुतारीचा अधिकृत उमेदवार पाडला आणि भाजपचा उमेदवार निवडून आणला होता. ज्यांनी पक्षाचे नुकसान केले, त्यांना आता आम्ही मत का टाकायचे?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.

विरोधी उमेदवार तीनदा फोन करून गेला, पण स्वपक्षीय उमेदवाराचा साधा फोनही नाही!

आमच्या पक्षाचे उमेदवार असलेल्या वसंत देशमुखांनी मला साधा एक फोनही केला नाही की प्रत्यक्ष भेट घेतली नाही. याउलट, विरोधी पक्षाचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत हे मला स्वतः येऊन भेटले आहेत आणि त्यांचे तीन वेळा फोनही आले आहेत. पक्षाकडून होत असलेल्या या वागणुकीमुळेच आता वेगळा विचार करावा लागेल, असे सूचक संकेत अभिजीत पाटील यांनी दिले.

लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणुका व्हायलाच हव्या. ही विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी असे माझे कधीच मत नव्हते. देशाला एक नवीन वळण देण्यासाठीच ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा उगम झाला आहे. या पक्षाच्या माध्यमातून देशातील आणि राज्यातील जनतेची, तरुणांची खदखद आता बाहेर येणार असून लोकांसाठी हे एक मोठे व्यासपीठ तयार झाले आहे.” ही नवीन पार्टी आगामी काळात प्रस्थापित भारतीय जनता पार्टीसाठी (BJP) मोठी धोक्याची घंटा ठरेल, असा दावा अभिजीत पाटील यांनी केला.

Follow Us