सोलापुरात भीषण अग्नितांडव, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत

सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसी रोडवर असलेल्या सेंट्रल कारखान्याला भीषण आग लागली, या दुर्दैवी घटनेत आठ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

सोलापुरात भीषण अग्नितांडव, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबांना 5 लाखांची मदत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2025 | 11:32 PM

सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसी रोडवर असलेल्या सेंट्रल कारखान्याला भीषण आग लागली, या दुर्दैवी घटनेत आठ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेत पहाटे साडेपाच वाजता तीन कामगारांचा मृत्यू झाला होता, मात्र या घटनेनंतर  सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक आपल्या 5 नातेवाईकांसह मास्टर बेडरूम मध्ये लपून बसले होते, दुर्दैवानं या घटनेत त्यांचा देखील श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे.  सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. आठही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.  मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. बचाव कार्यादरम्यान फायर ब्रिगेडचे दोन जवान देखील जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

तब्बल 13 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं होतं, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गॅसचा स्फोट झाला आणि आग भडकली, अग्निशमन दलाकडून आगीवर  पुन्हा नियंत्रण मिळवण्यात आलं. सोलापुरातील या टेक्साईल कारखान्यात घडलेल्या अग्नितांडवाची पीएमओ कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. पीएमओ कार्यालयाकडून ट्विटरवर पोस्ट करत दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.  पीएमओ कार्यालयाकडून घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे, तसेच मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा देखील केली. ‘सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या दुर्दैवी घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.