Gajanan Kale : ‘…तर बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला हा शापच; मनसेच्या गजानन काळेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

| Updated on: Jun 22, 2022 | 5:27 PM

कोणत्याही विचारधारेशी बांधिलकी न ठेवता हे अनैसर्गिक सरकार आले आहे, त्याचीच फळे या महाराष्ट्रात आलेली दिसत आहेत. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर... या अर्थाने ईश्वराचीच काठी या सरकारला बसली की काय, असे गजानन काळे म्हणाले.

Gajanan Kale : ...तर बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला हा शापच; मनसेच्या गजानन काळेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
Image Credit source: tv9
Follow us on

सोलापूर : औरंगजेब याच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होणाऱ्यांबरोबर स्वत:ला असली हिंदुत्ववादी म्हणणारे युती करत असतील, तर बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला हा शापच असल्याचे वाटू लागले आहे, असा टोला मनसे नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी शिवसेनेला लगावला आहे. ते सोलापुरात बोलत होते. राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे, एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यामुळे धोक्यात आलेले महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) यामुळे पेचप्रसंग उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभा राहिला आहे. महाविकास आघाडी सरकार आकड्यांअभावी कोसळणार, असे बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधक असलेल्या मनसेने (MNS) शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी सोडलेली नाही. धार्मिक, भावनिक आणि नामकरणाच्या राजकारणावरून पुन्हा एकदा मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.

‘जैसे ज्याचे कर्म तैसे…’

गजानन काळे म्हणाले, की कोणत्याही विचारधारेशी बांधिलकी न ठेवता हे अनैसर्गिक सरकार आले आहे, त्याचीच फळे या महाराष्ट्रात आलेली दिसत आहेत. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर… या अर्थाने ईश्वराचीच काठी या सरकारला बसली की काय? असा सवाल करत औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवण्याऱ्यांसोबत सत्ता स्थापन करणे आणि त्यांची मदत घेऊन राज्यसभेत निवडणूक होणार असतील तर बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला हा शापच असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

‘शरद पवार यांनी शिवसेना संपवायचे स्वप्न पाहिले होते’

पुढे ते म्हणाले, की राज्यात जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. मतदारांनी कौल कोणाला दिला आणि सरकार कोणाचे आले? शरद पवार यांनी शिवसेना संपवायचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. आता फक्त आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत आमदार म्हणून राहतात की काय, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेच सैनिक राहणार आणि सर्व सैनिक निघून जाणार की काय, असे चित्र दिसत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

‘राष्ट्रवादीकडे शिवसेना पक्ष गहाण’

त्यासोबतच ते पुढे म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडे शिवसेना पक्ष गहाण ठेवल्यासारखा वाटत होता. अबू आझमी यांच्या दोन आमदारांबरोबर मिठ्या कोणी मारल्या हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. या सर्व घडामोडींवर त्यांची अधिकृत भूमिका लवकरच येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शिवसेनेवर टीका करताना काय म्हणाले गजानन काळे?