शरद पवार यांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे दोन आमदार, थेट ‘बंदोबस्त’ करण्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मोठा इशारा दिला आहे. त्यापैकी त्यांनी एका आमदाराचा बंदोबस्त करण्याचा इशारा दिलाय. तर दुसरा आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवार यांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे दोन आमदार, थेट बंदोबस्त करण्याचा इशारा
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2023 | 4:14 PM

सागर सुरवसे, Tv9 मराठी, सोलापूर | 16 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सोलापुरात शेतकरी मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मोठे नेते आणि आमदारांना इशारा दिलाय. यामध्ये एक आमदार हा राज्याचा मदत आणि पुनर्वसन विभागाचा मंत्री आहे. शरद पवार पहिल्यांदाच दोन नेत्यांच्या बद्दल इतकं आक्रमक आणि टोकाचं बोलले आहेत. याशिवाय शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांबद्दल भीष्मप्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांच्या अडचणीत वाढ होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे आणि अनिल पाटील यांना मोठा इशारा दिला आहे. शरद पवारांनी शेतकऱ्यांना बबनदादा शिंदे यांच्या विरोधातील कागदपत्राचे पुरावे आपल्याकडे देण्याचं आवाहन केलं आहे. त्यातून शरद पवार बंदोबस्त करणार असल्याचं म्हणाले आहेत. तर अनिल पाटील यांच्या मतदारसंघात आपण गेलो असून ते पुन्हा निवडून येणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर शरद पवारांची टीका

यावेळी शरद पवार यांनी आमदार बबनदादा शिंदे यांनाही मोठा इशारा दिला. “इथल्या नेत्याने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढले. त्याबाबत माझ्याकडे कागदपत्रे द्या. ती कागदपत्रे घेऊन आल्यावर मी त्याचा जो बंदोबस्त करायचा तो बंदोबस्त करतो”, अशा इशारा शरद पवारांनी दिला. “इथले नेतृत्व काही जणांवर दबाव आणत आहे. मात्र त्या दबावाला झुगारून आपण काम करूयात”, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांचा अनिल पाटील यांना इशारा

“मंत्री अनिल पाटील यांच्या मतदार संघात मी दौरा केलाय. पुढील विधानसभेला ते निवडून येणार नाहीत”, असा मोठा इशारा शरद पवारांनी दिला. “आम्ही दिवाळीनंतर जागवाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. लवकरच जागावाटप झालेलं पाहायला मिळेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबतच काही स्थानिक पक्षाला सोबत घेऊन जागावाटप होईल”, असं शरद पवार म्हणाले.