सांगोला-मिरज मार्गावर भीषण अपघात, सात वारकऱ्यांचा मृत्यू

| Updated on: Oct 31, 2022 | 10:30 PM

सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

सांगोला-मिरज मार्गावर भीषण अपघात, सात वारकऱ्यांचा मृत्यू
Follow us on

सोलापूर : गुजरातच्या मोरबी शहरात झुलता पूल नदीत कोसळल्याने मोठी जीवतहानी झाल्याची बातमी ताजी असताना आज महाराष्ट्रात एक वेदनादायी आणि अनपेक्षित घटना घडली आहे. या घटनेतही मोठी जीवितहानी झाल्याची माहिती सामोर आली आहे. सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झालाय. या अपघातात तब्बल सात वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी गावाजवळ हा अपघात झाला आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाहनाची जोराची धडक बसली. या धडकेत सात वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये पाच महिला एक पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठार वाडीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

खरंतर सर्व 36 वारकरी हे कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांची दिंडी रस्त्याच्या एका कडेने ज्ञानोबा-माऊलीचा जप करत पुढे सरकत होती.

हे सुद्धा वाचा

या दरम्यान रसत्याने जाणारा एक कार थेट दिंडीत घुसली. या कारने अनेक वारकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित अपघाताच्या घटनेमुळे सांगोला-मिरज मार्गावरील वाहतूक खोळंबली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. ते तातडीने घटनास्थळी गेले.

स्थानिक गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. पण या अपघातात आतापर्यंत सात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.