
राज्यात निकालाआधीच सत्ताधारी पक्षाचे 60 हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.त्यामुळे विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेत लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप केला होता. राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणूकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. आज राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 75 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बिनविरोधी विजयी उमेदवारासंदर्भात आलेल्या तक्रारीवर माहिती दिली आहे.
राज्यातील 29 महानगर पालिका निवडणूकांच्या प्रचाराची मुदत मंगळवारी ( 13 जानेवारी 2026 ) सायंकाळी संपली. आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 75 पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूकीचे मतदान 5 फेब्रुवारीला असून मतमोजणी आणि निकाल 7 फेब्रुवारीला आहे.
यावेळी राज्यात सत्ताधारी पक्षाचे 60 हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे प्रकरणात काय कारवाई झाली असा सवाल पत्रकारांनी केला असता निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की बिनविरोध निवडणुकीची अहवाल महापालिका आयुक्तांकडून मागवले आहेत.
या संदर्भात काही मुद्यांवर हा अहवाल मागितला आहे. हा अहवाल खालील पॉइंटवर मुद्द्यांवर मागवला आहे. 1) उमेदवारावर दबाव आहे का ? 2) माघार घेतलेल्यांना आमीष दाखवले का? 3)पोलीस तक्रार झाली का ? 4) काही तक्रार झाली का ? तसेच ज्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यांनी स्वखुशीने माघार घेतली का ? या मुद्यांवर हा अहवाल मागवला आहे. या संदर्भात अहवाल आल्यावर त्याबाबतचा निर्णय घेऊ असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघ यांनी म्हटले आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षा 9 फेब्रुवारी रोजी आहे. 12 वीच्या परीक्षा 12 फेब्रुवारीपासून आहेत. त्यामुळे या निवडणूक प्रक्रिया आम्हाला पूर्ण करायच्या आहेत. राज्यातील फायनल दुबार मतदार 10 लाख 32 हजार आहे. मुंबई महापालिकेत 1 लाख 20 हजार शिल्लक राहिले आहेत अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणूका येत्या 15 जानेवारी रोजी आहे. या निवडणूकांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील काही महानगर पालिकात वादावादी, आरोप-प्रत्यारोप झाले होते.तसेच अर्ज मागे घ्यावा म्हणून पैशाचे आमीष आणि धमकवण्यात आरोपही विरोधी नेत्यांनी केले आहेत. राज्यात सत्ताधारी पक्षाचे 60 हून अधिक उमेदवार विजयी घोषीत करण्यात आले आहेत.