
Mumbai Police : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल पण आरक्षण घेणारच, असे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे जरांगे यांचे समाधान होण्यासाठी नेमके काय करायला हवे? असा प्रश्न सरकारपुढे उभा ठाकले आहे. दुसरीकडे ओबीसी संघटनांनीही उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. आरक्षण देण्यास विरोध केल्यास आणखी मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे, असेही जरांगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत मराठा आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. परिणामी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेता आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांचे आंदोलन यामुळे सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा आणि गैरहजर असलेल्या पोलिसांना तातडीने कर्तव्यावर येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नायगावच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या पत्राद्वारे तशा सूचना केल्या आहेत. राज्यात सुरू असलेला गणेशोत्सव आणि मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल आहेत. तसेच इतर पोलीस कर्मचारी सुट्टीवर असल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने मुंबईत अधिक पोलीस असणे गरजेचे असून त्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारो लोक मुंबईत आले आहेत. त्यांच्या वाहनांची व्यवस्था पाहण्यापासून इतर सर्वच गोष्टींची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सुट्टीवर असलेल्या आणि मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या सर्वच पोलिसांना तत्काळ सेवेसाठी हजर राहावे लागणार आहे.