
Nilesh Ghaiwal : पुण्यातील कोथरुडमध्ये गोळीबाराचे प्रकरण समोर आल्यानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ आता परदेशात पळून गेला आहे. याच निलेश घायवळबाबत थक्क करणाऱ्या एक-एक गोष्टी समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी नुकतेच निलेश घायवळच्या पुण्यातील घरावर छापेमारीची कारवाई केली होती. त्यानंतर आता माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. ते पत्रकार परिषद घेऊन रोज नवनवे खुलासे करत आहेत. असे असतानाच आता आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे. पुणे पोलिसांचा विरोधा डावलून निलेश घावयवळ याला शस्त्रपरवाना देण्यात आल्याचे समोर आले आहे. निलेश घायवळ हा सचिन घायवळचा भाऊ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सचिन घायवळ याला शस्त्रपरवाना देऊ नये, असे पुणे पोलिसांचे मत होते. मात्र पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळ याला हा शस्त्रपरवाना देण्यात आला. सचिन घायवळ हा गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ आहे. योगेश कदम यांच्या सहिने सचिन घायवळ याला 20 जून रोजी हा शस्त्रपरवाना देण्यात आल्याचे समोर आले आहे. सचिन घायवळवर पुणे पोलिसात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच सचिन घायवळला शस्त्रपरवाना देऊ नये, असा अहवाल पुणे पोलिसांनी गृहखात्याला दिला होता. मात्र या अहवालातील शिफारशी डावलून सचिन घायवळ याला शस्त्रपरवाना देण्यात आला. तशी बाब समोर आली आहे.
निलेश बन्सीलाल घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न, आर्म्स ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घायवळ टोळीचा निलेश घायवळ याच्यानंतर सचिन घायवळ म्होरक्या होता. त्यामुळे आता राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनीच सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिल्यामुळे राजकारण तापले आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात योगेश कदम यांचे नाव समोर आल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली आहे. शस्त्र परवाना देण्याचा आणि गृहराज्यमंत्र्यांचा संबंध नसतो. शस्त्रपरवान्यावर तिथल्या आयुक्तांची सही असते. कोणाला शस्त्रपरवाना द्यायचा हे तिथले आयुक्त ठरवत असतात, असे शिरसाट यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते.
उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या…
— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) October 8, 2025
दुसरीकडे योगेश कदम यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी होत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असे ट्विट योगेश कदम यांनी केले आहे.