
Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. पत्रकार परिषद घेऊन राज्य निवडणूक आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम सविस्तरपणे सांगितला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्य राज्य निवडणूक आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. याच दरम्यान, पत्रकार परिषद चालू असतानाच मोठा गोंधळ उडाला. एका व्यक्तीला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद चालू होती. यावेळी उपस्थित असलेले पत्रकार निवडणूक आयोगाला एक-एक प्रश्न विचारत होते. तर निवडणूक आयोगदेखील विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देत होता. मात्र याच वेळी एक व्यक्ती आली आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारायला लागली. विशेष म्हणजे ही व्यक्ती पत्रकार नव्हती. तरीदेखील त्या व्यक्तीला पत्रकार परिषदेत पत्रकार म्हणून स्थान देण्यात आलं. ही व्यक्ती पत्रकार नसल्याचे समजताच अन्य पत्रकारांनी त्यांना थांबवलं. पत्रकार नसताना तुम्ही प्रश्न का विचारत आहात? असा सवाल करत या व्यक्तीला थांबवण्यात आलं. नंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. सध्या या व्यक्तीची चौकशी चालू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजेश त्रिपाठी असे गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तर भारतीय विकास सेना पक्षाच्या वतीने या व्यक्तीने प्रश्न विचारला होता. मात्र त्याला पत्रकारांनी त्याला मध्येच रोखले आणि नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचाराची रणधूमाळी पाहायला मिळणार आहे. सोबतच या काळात पक्षांतर आणि राजीनाम्यांची नवी लाट येऊ शकते. त्यामुळे भविष्यात नेमके काय काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.