
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच, शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये महापौरपदावरून जोरदार जुगलबंदी सुरू झाल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या उमेदवाराला महापौर पदासाठी पुढे करत असल्याने आगामी निवडणुकीत युतीमध्ये बिघाडी होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात,’कल्याण-डोंबिवलीला विकासाचे ग्रहण लागले आहे, ते दूर करण्यासाठी भाजपचा महापौर होणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे सांगत कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचे आणि कल्याण-डोंबिवली भाजपमय करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्याला भाजप आमदार किसन कथोरे यांनीही दुजोरा दिला आहे. अध्यक्षांनी सांगितलेल्या मार्गानेच आम्हाला चालावे लागेल आणि कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी भाजपचाच महापौर हवा असा ठाम निर्धार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या या विधानानंतर शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे यावर, शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या २५ वर्षांपासून कल्याणमध्ये शिवसेनेचा भगवा फडकत आहे. ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेना हा मोठा पक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वबळावर लढण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत, असे सांगत अरविंद मोरे यांनी महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
“एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांमुळे जनतेच्या मनात शिवसेनेबद्दलचे महत्त्व वाढले आहे. युती झाली तर भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत देखील होऊ शकतात,” असे म्हणत स्वबळाच्या शक्यतेला अरविंद मोरे यांनी बळ दिले आहे. या विरोधात शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी मात्र सावध भूमिका घेतली. महायुती आहे आणि प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी प्रयत्न करू, पण अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे रवी पाटील यांनी म्हटले आहे.
या सर्व घडामोडींवरून, आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही मित्रपक्ष महापौरपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकल्यास आश्चर्य वाटायला नको. दोन्ही पक्षांकडून सुरू असलेली ही राजकारणाची खेळी येत्या काही महिन्यांत आणखी कोणत्या दिशेने जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.