‘2 वर्षांपासून बेरोजगार, तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय’, पायपीट करत नगरहून विद्यार्थी मातोश्रीकडे रवाना

| Updated on: Dec 02, 2020 | 11:06 PM

विविध मागण्यांसाठी उच्चशिक्षित विद्यार्थी अहमदनगरहून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासाकडे पायी निघाले आहेत. आज (2 डिसेंबर) सकाळी 11 वाजता या विद्यार्थ्यांनी नगरच्या चौथे शिवाजी स्मारकातून मुंबईकडे कूच केली.

2 वर्षांपासून बेरोजगार, तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय, पायपीट करत नगरहून विद्यार्थी मातोश्रीकडे रवाना
Follow us on

अहमदनगर : विविध मागण्यांसाठी उच्चशिक्षित विद्यार्थी अहमदनगरहून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासाकडे पायी निघाले आहेत. आज (2 डिसेंबर) सकाळी 11 वाजता या विद्यार्थ्यांनी नगरच्या चौथे शिवाजी स्मारकातून मुंबईकडे कूच केली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, कृषी मंत्री आणि उद्योग मंत्री यांच्यासह राज्यातील सर्व विद्यार्थी संघटनांची एक उच्च स्तरीय समिती स्थापन करावी, नव्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ठेकेदारीसाठी कामं मिळावीत, मोठमोठे टेंडर पध्दत बंद करावीत आणि 3 लाख ते 6 लाखांपर्यंतच्या रकमेचे टेंडर करू नयेत, महाविद्यालय प्राध्यापक भरतीवेळी होणार हनी लाँडरींग थांबवावी, राज्यातील सर्व शिक्षण संचालकांच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशा अनेक मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास मातोश्री बाहेर अन्नत्याग आंदोलन करण्याचाही इशारा या विद्यार्थ्यांनी दिलाय (Student from Ahmednagar march towards Matoshri Mumbai to visit CM Uddhav Thackeray).

या विद्यार्थ्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे, “आम्ही गेल्या 12 वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करत आहोत. 2012-13 च्या दुष्काळी स्थितीत आम्ही आमच्या पातळीवर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी होस्टेल आणि जेवणाची व्यवस्था केली. तसेच शैक्षणिक साहित्याचाही प्रश्न सोडवला. यासाठी आम्हाला समाजातील दानशूर व्यक्ती विविध शैक्षणिक संस्था तसेच आमच्यातीलच काही सधन विद्यार्थी कार्यकर्त्यांनी मदत केली. यातून जवळपास 6 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. 14 जिल्ह्यांमध्ये आम्ही कार्यरत असून आमचा नेहमीच मुजोर अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासन आणि विद्यापीठांशी संघर्ष झाला.”

‘2 वर्षांपासून बेरोजगार तिकिटालाही पैसे नाही, पायी येतोय’

“आम्ही पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी येत आहोत, परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती आणि गेल्या 2 वर्षांपासूनची बेरोजगारी; यामुळे परिस्थिती नसल्याकारणाने आम्ही पायी चालत येत आहोत. कोरोना काळ असल्याने आम्ही सरकारी वैद्यकीय सूचनांचे पालन करत तुम्हाला भेटण्यासाठी मुंबईला मातोश्रीवर येत आहोत. कोरोनाच्या काळात तुम्ही महाराष्ट्रातील सर्व मुलांची मोठ्या चुलत्याच्या प्रेमानं आमची काळजी घेतली. म्हणूनच आम्ही तुमचा उल्लेख काका म्हणून करत आहोत. उद्धव काका आम्ही 2 डिसेंबर 2020 रोजी आमच्या अहमदनगर येथील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथून निघलो आहोत.”

“पायी चालत आम्ही तुमच्याकडे मुंबईला किती दिवसात पोहोचू हे माहीत नाही? परंतु आम्ही 10 ते 12 दिवसांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करू. तरी आपण आम्हाला वेळ द्यावा हीच विनंती. जर तुम्ही राज्य सरकारच्या व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ देऊ शकला नाही तर निदान आपल्या आदित्य दादाला तरी आम्हाला भेटण्यासाठी सांगा.”

स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या मागण्या :

1) नव अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ठेकेदारीसाठी कामं मिळावे, मोठे टेंडर पध्दत बंद करावी, 3 लाख ते 6 लाखांपर्यंत रकमेचे टेंडर करू नये

2) महाविद्यालय प्राध्यापक भरतीवेळी होणार हनी लाँडरींग थांबवावी, राज्यातील सर्व शिक्षण संचालकांच्या चौकशीचे आदेश द्यावेत

3) स्थापत्य आणि वीज अभियंता ठेकेदारीसाठी नोंदणीसाठी आकारले जाणारे शुल्क बंद करावे, नवीन स्थापत्य अभियंता मुलांना येणारे 10 लाखांपर्यंतची कामं 40 टक्के आकर्षित असावी

5) फार्मसी विद्यार्थ्यांना मेडिकल सुरू करण्यासाठी सरकारने कर्ज योजना निर्माण करावी

6) अभियांत्रिकीचा व्यावसायिक दर्जा रद्द करावा आणि त्याचे प्रवेश शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 5 पेक्षा जास्त नसावे

7) कार्यकारी अभियंता नवीन ठेकेदारीसाठी लाच मागतात यावर चौकशी करून सदरील मस्तवाल अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

8) महाविद्यालय अधिव्याख्याता आणि प्राध्यापक भरतीवेळी नेट सेटची अट रद्द करावी, राज्यातील शिक्षण संचालकांच्या न्यायालयीन चौकशा करण्यात याव्यात

9) राज्यातील पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी

10) CHB म्हणजे घड्याळ तासिकेप्रमाणे शिक्षकांचं 72 रुपये मानधन वाढवून 200 रूपये करावं आणि विज्ञान विभागाचे विनाअनुदानित प्राध्यापकांचं मानधन 8 हजारांहून 15 हजार रुपये करावं, सरकारने शिक्षण संस्था चालकांना तसे आदेश द्यावेत

हेही वाचा :

खेड्यात ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा, मोबाईलसाठी विद्यार्थी मजुरीला

भारताच्या विद्यार्थ्याला 10 पेक्षा अधिक वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीकडून रिसर्च इंटर्नश‍िपची ऑफर

ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्यामुळे शिक्षण रथातून धडे; शहादा येथील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम

Student from Ahmednagar march towards Matoshri Mumbai to visit CM Uddhav Thackeray