
राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीच्या प्रचाराला काही तास शिल्लक असतानाच रविवारी निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील काही नगर परिषदेच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे, यामध्ये काही ठिकाणी संपूर्ण नगर परिषदेच्याच निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली आहे, आता निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार राज्यात ज्या -ज्या ठिकाणी अशी स्थगिती देण्यात आली आहे, त्या ठिकाणी येत्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान आता या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत मोठी मगाणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?
‘नगर परिषद व नगरपंचायतीच्या काही निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगित केल्या आहेत. आपोआपच आता या निवडणुकांचा दुसरा मतदान टप्पा 20 डिसेंबर रोजी होणार. या पार्श्वभूमीवर आवश्यक आहे की 2 डिसेंबर ला पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यावर तेथील नगर परिषद व नगरपंचायतीचे निकाल लगेच 3 डिसेंबर जाहीर न करता सगळे निकाल 21 डिसेंबर ला जाहीर करावे. तसे करणे पारदर्शक व मोकळ्या वातावरणात प्रामाणिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी या निवडणूक आयोगाच्या कायदेशीर बंधनकारक जबाबदारीचा भाग आहे.’ असं ट्विट असीम सरोदे यांनी केलं आहे.
नगर परिषद व नगरपंचायतीच्या काही निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगित केल्या आहेत. आपोआपच आता या निवडणुकांचा दुसरा मतदान टप्पा 20 डिसेंबर रोजी होणार. यापार्श्वभूमीवर आवश्यक आहे की 2 डिसेंबर ला पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यावर तेथील नगर परिषद व नगरपंचायती चे निकाल लगेच 3…
— Asim Sarode (@AsimSarode) December 1, 2025
भाजपचीही नाराजी
दरम्यान निवडणूक आयोगानं अचानक निवडणुका पुढे ढकलल्यानं यावर भाजपने देखील नाराजी व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना हे चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अचानक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं संबंधित उमेदवारांचा चांगलाच गोंधळ उडाल्याचं पहालया मिळत आहे.