तटकरे कुटुंबावर टीका करणाऱ्यांना सोडणार नाही; सुनील तटकरेंच्या खास शिलेदाराचा शिंदेसेनेच्या आमदाराला सज्जड दम, राजकारण तापलं!

Raigad Politics News: आमदार महेंद्र थोरवेंच्या आरोपांना सुधाकर घारेंनी प्रत्युत्तर दिले आहे. थेट आव्हान देत निवडणुकीत पराभवाचा इशारा त्यांनी दिला आहे.

तटकरे कुटुंबावर टीका करणाऱ्यांना सोडणार नाही; सुनील तटकरेंच्या खास शिलेदाराचा शिंदेसेनेच्या आमदाराला सज्जड दम, राजकारण तापलं!
Sudhakar Ghare Hits Back at Mahendra Thorve
| Updated on: Nov 09, 2026 | 10:00 PM

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अनिकेत तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या थोरवेंनाच घारेंनी आता राजीनामा देण्याचे आव्हान दिले आहे. एवढेच नाही, तर आगामी निवडणुकीत थोरवेंचा पराभव करून दाखवू, असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला.

महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी थोरवेंच्या आरोपांचा समाचार घेतला. आमदार अनिकेत तटकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महेंद्र थोरवे यांनी केली होती. या मागणीला उत्तर देताना घारे यांनी थोरवेंनाच लक्ष्य केले.

Loading...

अनिकेत तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या महेंद्र थोरवेंनी आधी स्वतःचा राजीनामा द्यावा, असे थेट आव्हान सुधाकर घारे यांनी दिले. तसेच यावेळी महेंद्र थोरवेंचा निवडणुकीत निश्चित पराभव करून दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे तटकरे कुटुंबीयांवरील वक्तव्यांवरून सुरू झालेला वाद आता थोरवे विरुद्ध घारे अशा राजकीय संघर्षाच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.

या पत्रकार परिषदेत सुधाकर घारे यांनी टोरंट प्रकल्पाचा मुद्दाही उपस्थित केला. सध्या टोरंट प्रकल्पाचा गंभीर विषय चर्चेत आहे. मात्र या विषयावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच महेंद्र थोरवे अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचा आरोप घारे यांनी केला. टोरंट प्रकल्पाबाबत जनतेमध्ये चर्चा सुरू असताना राजकीय वक्तव्यांच्या माध्यमातून मूळ प्रश्न बाजूला सारण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.

सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी चुकीचे भाष्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही सुधाकर घारे यांनी दिला. यापुढे कोणीही तटकरे कुटुंबीयांबाबत चुकीची वक्तव्ये केली, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. एकीकडे महेंद्र थोरवे यांनी अनिकेत तटकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे सुधाकर घारे यांनी थोरवेंनाच राजीनाम्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे रायगडमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांवर महेंद्र थोरवे काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us