Pallavi Joshi : हा आपल्या संस्कृतीचा अभिमान नाही…फटाक्यांच्या रॉकेटमुळे पल्लवी जोशीच्या घरी मोठी दुर्घटना
Vivek Agnihotri : अभिनेत्री पल्लवी जोशीच्या घरी फटाक्यातील रॉकेट येऊन सोफ्यावर आदळलं. याबद्दल अभिनेत्रींचे पती विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय.

दिवाळी हा आनंद आणि दिव्यांचा सण आहे, पण थोडासा निष्काळजीपणासुद्धा या आनंदाचं रूपांतर एका मोठ्या दुर्घटनेत करू शकतो. फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आता, अभिनेत्री पल्लवी जोशीच्या घरी दुर्घटना होता होता राहिली आहे. याबद्दल अभिनेत्रीचे पती विवेक अग्निहोत्री यांनी घडलेली घटना सांगितली आहे.
दिवाळीच्या रात्री त्यांच्या बाल्कनीत एक रॉकेट पडलं, ज्यामुळे सोफ्याला आग लागली. सुदैवानं, त्यांच्या पाळीव कुत्र्यांनी वेळीच कुटुंबाला सावध केलं आणि एक मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर विवेक यांनी फटाक्यांचे धोके आणि प्रशासनाच्या जबाबदारीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट
विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर या घटनेबद्दल पोस्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनाही टॅग केलं. महापौरांनी लोकांना सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचं आणि फटाक्यांच्या वापराबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना विवेक यांनी आपला अनुभव सांगितला. विवेक यांनी लिहिलं की, ‘काल रात्री आमच्या बाल्कनीतील सोफ्यावर एक रॉकेट आदळलं आणि त्याला आग लागली. सुदैवानं, आमच्या कुत्र्यांनी आम्हाला वेळेवर सावध केलं. सोफ्याचं कापडही अग्निरोधक होतं, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.’

विवेक यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या कुटुंबाला अशा घटनांची नेहमीच भीती वाटायची. यावेळी सुदैवानं कोणतंही मोठं नुकसान झालं नाही, पण अशी घटना दुसऱ्या घरात घडल्यास काय होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिवाळी साजरी करायला कोणाला आवडत नाही? पण इकडेतिकडे पडणारे रॉकेट्स हे आपल्या संस्कृतीचा अभिमान नाही, आगीचा धोका आहे. आपली संस्कृती आपल्याला निष्पाप लोकांचे जीव, घरं आणि मालमत्ता धोक्यात घालण्यास सांगत नाही. केवळ फटाके फोडणाऱ्यांनाच नव्हे, तर जनजागृती करणे, न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे आणि अग्निसुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरलं पाहिजे.
I am deleting my previous tweet. Neither do I want to be the reason for anyone’s outrage nor do I want to enable or weaken anyone’s cultural or environmental narrative.
Happy Diwali to everyone, once again. 🇮🇳 🪔
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 9, 2026
मात्र, विवेक यांनी ही पोस्ट डिलीट करत माफी मागितली आहे.
